हिंगोली: सोयाबीन पिकाची नासाडी डोळ्यांसमोर पाहून वसमतमधील ६० वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हिंगोली: निसर्गाचा लहरीपणा, पावसाचा दगाफटका आणि शेतमालाला नसलेला भाव या तिहेरी संकटात मराठवाड्यातील बळीराजा कसा भरडला जात आहे, याचे मन पिळवटून टाकणारे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. काढणीनंतर सोयाबीनचा उतारा अत्यंत नगण्य येणार हे स्पष्ट दिसताच, झालेला उत्पादन खर्च कसा भागवायचा आणि वर्षभर कुटुंबाचे पोट कसे भरायचे या विवंचनेतून एका ६० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा सोयाबीनच्या चुडीसमोरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शेतातच मृत्यू झाला. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना वसमत तालुक्यातील पार्डी बु. येथे मंगळवारी (दि.६) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

अवघ्या ५८ गुंठ्यांचा आधारवड कोसळला
रामराव प्रभाकर शुक्रवार (वय ६० वर्षे, रा. पार्डी बु., ता. वसमत) असे मृत पावलेल्या दुर्दैवी अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. रामराव शुक्रवार यांच्याकडे केवळ ५८ गुंठे इतकीच अल्प शेतजमीन आहे. चालू खरीप हंगामात त्यांनी मोठ्या आर्थिक आशेने, उसनवारी करून आणि अहोरात्र घाम गाळून शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. पिकाची मशागत करून ते कसेबसे जोपासले होते. मंगळवारी सकाळी १०:३० वाजता ते शेतात सोयाबीनची काढणी व चुडीचे (पेंढ्यांचा ढीग) एकत्रिकरण पाहण्यासाठी स्वतः हजर राहिले होते.

नगण्य उतारा पाहताच मनावर प्रचंड ताण
मात्र, संपूर्ण ५८ गुंठ्यांतील सोयाबीन जमा केल्यानंतर शेतात तयार झालेला चुडीचा ढीग अपेक्षेपेक्षा अत्यंत नगण्य दिसला. मळणीनंतर हाती दोन पोतीही धान्य येणार नाही हे स्पष्ट दिसताच रामराव यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. बियाणे, खते आणि काढणीचा खर्च कसा फेडायचा? वर्षभराचा संसाराचा गाडा कसा हाकायचा? या विवंचनेने त्यांच्या मनावर प्रचंड ताण आला. सोयाबीनच्या ढिगाऱ्याकडे पाहत असतानाच त्यांच्या छातीत अचानक असह्य कळ उठली आणि ते जागीच कोसळले. काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली.


गावात हळहळ; शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत द्या
रामराव शुक्रवार यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावातील शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. कष्टाळू शेतकऱ्याचा असा डोळ्यांदेखत करुण अंत झाल्याचे पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. मयत रामराव यांच्या पश्चात वृद्ध पत्नी आणि एक मुलगा असा परिवार असून, कमावता आधारवड गेल्याने हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी ओढवून शेतातच प्राण गमावलेल्या या अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे शासनाने केवळ कागदी पंचनाम्यांवर न थांबता या कुटुंबाला तातडीने विशेष बाब म्हणून भरीव आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी पार्डी बु. येथील ग्रामस्थांनी केली आहे.

 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *