पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! 'माथेरानची राणी' पुन्हा धावणार; दसऱ्याच्या मुहूर्तावर २० ऑक्टोबरपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पूर्ववत

मुंबई/रायगड: माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून गेल्या काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेली पर्यटकांची आवडती 'नेरळ ते माथेरान' पूर्ण मिनी ट्रेन (टॉय ट्रेन) सेवा आता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच २० ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा सुरुळीत सुरू होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, यामुळे आगामी सण-उत्सव आणि पर्यटनाच्या हंगामात माथेरानला भेट देणाऱ्या हजारो पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरवर्षी मुसळधार पावसामुळे आणि डोंगराळ भागातील भूस्खलनाच्या धोक्यामुळे मध्य रेल्वेकडून खबरदारीचा उपाय म्हणून १५ जून ते १५ ऑक्टोबर दरम्यान नेरळ ते अमन लॉज दरम्यानची पूर्ण मिनी ट्रेन सेवा तात्पुरती स्थगित करण्यात येते. या कालावधीत केवळ माथेरान ते अमन लॉज दरम्यानच अल्प अंतराची 'शटल सेवा' सुरू ठेवली जाते, जेणेकरून स्थानिक रहिवासी व पर्यटकांची गैरसोय होऊ नये. मात्र, आता पावसाळा संपल्याने रेल्वे प्रशासनाने संपूर्ण ट्रॅकची तांत्रिक तपासणी, देखभाल आणि दुरुस्ती पूर्ण केली आहे. त्यामुळे २० ऑक्टोबरपासून संपूर्ण २१ किलोमीटरच्या नेरळ-अमन लॉज-माथेरान मार्गावर मिनी ट्रेन पुन्हा पूर्वीप्रमाणेच धावण्यासाठी सज्ज झाली आहे.

पर्यटनाला आणि स्थानिक व्यवसायाला मिळणार मोठी गती: सह्याद्रीच्या कुशीत वळणावळणाच्या हिरव्यागार डोंगरामधून प्रवास करणारी 'माथेरानची राणी' ही केवळ प्रवासाचे साधन नसून माथेरानच्या पर्यटन स्थळाची खरी ओळख आहे. दसऱ्याच्या सुट्ट्या आणि त्यानंतर येणारी दिवाळीची सुट्टी लक्षात घेता, लाखो पर्यटक माथेरानमध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दाखल होतात. नेरळवरूनच थेट मिनी ट्रेन सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि आनंददायी होणार आहे. या निर्णयामुळे माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक, घोडेवाले, हस्तकला विक्रेते आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *