सहा हजार थकवून पाच हजारांची मदत; ही कसली दिवाळी! 'नमो शेतकरी'चा नववा, दहावा हप्ता रखडला; पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याची प्रतीक्षा संपेना

राज्यातील शेतकरी वर्ग सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाच, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे हप्ते रखडल्यामुळे बळीराजामध्ये मोठी नाराजी पसरली आहे. 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे' तब्बल दोन हप्ते थकीत असताना, ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळी मदत म्हणून पाच हजार रुपयांचे अग्रीम देण्याची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची एकप्रकारे थट्टाच असल्याची टीका शेतकरी संघटना आणि सर्वसामान्य बळीराज्याकडून केली जात आहे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या नमो शेतकरी योजनेचा नववा आणि दहावा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. या दोन थकीत हप्त्यांपोटी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे एकूण चार हजार रुपये मिळणे अद्याप बाकी आहे. आता तर या योजनेच्या अकराव्या हप्त्याची वेळ जवळ आली असून त्याबाबतही प्रचंड अनिश्चितता कायम आहे. यामुळे आमचे आधीचे पैसे गेले कुठे? असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

दुसरीकडे, केंद्र सरकारच्या लोकप्रिय 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा' (PM Kisan Yojana) २४ वा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा देखील लांबणीवर पडली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या या दोन्ही महत्त्वाच्या योजनांचे पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या सणासुदीच्या काळात आर्थिक नियोजनाचे तीन तेरा वाजले आहेत. राज्य शासनाकडून नुकतीच दुष्काळी मदत म्हणून पाच हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असली, तरी आधीच नमो शेतकरी योजनेचे शेकडो रुपयांचे हप्ते थकल्यामुळे या नवीन मदतीचा फारसा दिलासा उरलेला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर, राज्यातील लाखो शेतकरी बँक खात्यांकडे डोळे लावून बसले आहेत की कधी सरकार हे रखडलेले पैसे जमा करणार. शासनाने केवळ घोषणा न करता रखडलेले सर्व हप्ते आणि पीएम किसानचा २४ वा हप्ता तातडीने दिवाळीपूर्वी वर्ग करावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा या बिकट परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सण साजरी करण्याची वेळ येईल, असा इशाराही दिला जात आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *