पुणे : भर दिवसा कोयत्याने वार करुन एकाची हत्या

किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची भर दिवसा पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करुन हत्या केली आहे. मारुती लक्ष्मण ढेबे (वय 20, सध्या रा. वारजे, मूळ रा. धनगरवस्ती नांदेड ता. हवेली.) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असण्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती ढेबे हा नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला केला. त्यात ढेबे याचा जागीच मृत्यू झाला. वर्दळीचा रस्ता असल्याने हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परिसरातील नागरिक व व्यावसायिकांमध्ये या घटनेमुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे, पोलीस हवालदार रामदास बाबर, निलेश राणे, पोलीस नाईक अशोक गिरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *