एन. रघुरामन यांचा कॉलम:दिव्याने भारतीय संस्कृतीचे महत्त्व अखंड ठेवले

माझ्या आठवणींमधले एक चित्र कधीच धूसर झाले नाही. माझी आई पायवाटेच्या कडेने एक-एक दिवा सजवत होती. रांगोळीच्या मध्यभागी एक मोठा दिवा ठेवला होता. हळूहळू मावळणारा सूर्य अंधाराला वाट करून देत होता. सायंकाळ होताच आईने दिवे लावायला सुरुवात केली. आईच्या चेहऱ्याच्या एका भागावर मंद प्रकाश पडला होता. त्यामुळे तिची अर्धी टिकली, हलके हसू आणि चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. नुकत्याच धुतलेल्या तिच्या केसांच्या काही लटा कपाळावर आणि कानांवर विखुरल्या होत्या. मी गप्पपणे तिच्याकडे पाहत अक्षरशः हरवून गेलो होतो. तिने माझ्याकडे पाहिले आणि विचारले, “काय पाहत आहेस?” मी म्हणालो, “तू अगदी महालक्ष्मी देवीसारखी दिसत आहेस. खूप सुंदर! तू मला मंदिरातल्या देवीची आठवण करून देत आहेस.” ती उठून जवळ आली आणि तिने माझ्या कपाळाचा मुका घेतला. ती माझी आई होती. आजसुद्धा मी माझी बहीण, पत्नी किंवा मुलीला दिवाळीसाठी दिवे सजवताना आणि उजळताना पाहतो, तेव्हा तोच प्रसंग डोळ्यांसमोर जिवंत होतो. चेहरे बदलले, पण भावना तीच आहे. बहुधा हीच ती सर्वात सुंदर रोषणाई आहे. कदाचित दिवाळी आपल्या आयुष्यात हे सर्व पेरून जाते. सन 1800 मधील भारतीय घरांतल्या दिवाळीच्या संध्याकाळची कल्पना करा. कुटुंबातील कुणीतरी मातीच्या छोट्या दिव्यांमध्ये जपून तेल ओतत आहे. कापसाची वात करून ती दिव्याच्या कडेला ठेवत आहे. वात पेटताच तिची ज्योत केवळ दारालाच उजळून टाकत नाही, तर अत्यंत निष्ठेने तो दिवा लावणाऱ्या स्त्रीचा चेहराही प्रकाशित करते. या दिव्यामध्ये काहीही भपकेबाज किंवा विशेष नव्हते. कुंभार त्याला मातीतून साकारायचा आणि भट्टीमध्ये भाजायचा. पण त्यात काहीतरी जादू होती. त्याला ना विजेची गरज होती, ना रिमोटची, ना कुठल्या आधुनिक बटनाची. त्या कुटुंबासाठी तो दिवा समृद्धी, आशा आणि आनंदाचे प्रतीक होता. आता 2026 च्या काळात येऊ या. दिव्याचे रूप आता खूप बदलले आहे. आता तो हत्ती, मोर, शंख किंवा कमळाच्या आकारात बनवला जातो. त्यात एकापेक्षा जास्त वाती आणि तेलासाठी वेगळी जागा असू शकते. तो 24 तास किंवा अगदी 100 तासांपर्यंत तेवत राहू शकतो. काही कारागिरांनी तर पाणी घालताच उजळून निघतात असे दिवे बनवले आहेत. आधुनिकतेचा स्पर्श आणि परंपरेची साथ शोधणाऱ्या आजच्या पिढीला आकर्षित करण्यासाठी कारागीर विविध साहित्य, रंग आणि नक्षीकामाचे नवे प्रयोग करत आहेत. दिव्याने एक प्रदीर्घ प्रवास केला आहे. पण त्याची ही वाटचाल अजून संपलेली नाही. विशेष म्हणजे 19 व्या शतकातही दिवा हा केवळ मातीची साधी वाटी नव्हता. संग्रहालयांमध्ये त्या काळातील पितळेचे अत्यंत सुंदर दिवे जतन केलेले आहेत. 1870 ते 1900 च्या काळातील पितळेचा एक “दीपालक्ष्मी दिवा’ कौशल्याने बनवला गेला होता. त्यात तेल आपोआप भरले जायचे. दिव्याची वाटी कायम भरलेली राहावी म्हणून कारागिराने त्यात ‘टँटलस कप’ तंत्रज्ञानाचा वापर केला होता. असाच एक पारंपरिक दिवा मोराच्या आकाराचा होता. त्याचे शरीरच तेलाच्या भांड्याचे काम करायचे. आज भारतीय कारागीर दिव्याला नवीन रूप देत आहेत. छत्तीसगडच्या कोंडागाव येथील एक कुंभार हत्तीच्या आकाराचा दिवा बनवतो. तो 100 तासांपेक्षा जास्त वेळ जळत राहतो. बेळगावीच्या कुंभारांनी 24 तास जळणारे दिवे तयार केले आहेत. लखनऊच्या ‘माटी कला उत्सवात’ इबरार अहमद यांनी पाण्याने पेटणारा दिवा तयार केला. एवढेच नाही तर कारागीर बांबू, नारळाच्या वाट्या, वाळू, पितळ आणि शेणापासूनही दिवे बनवत आहेत. दिल्लीतल्या विद्यार्थ्यांनी तर रंगाच्या मोकळ्या बादल्यांपासून ‘सोलार लॅम्प’ तयार केले आहेत. परंपरा आणि नावीन्य एकत्र चमकू शकतात हेच यातून सिद्ध होते. आपल्या कारागिरांचा उद्देश अगदी स्पष्ट आहे-आपले पारंपरिक शिल्प जपून काहीतरी नवीन निर्माण करणे. फंडा असा की, आज पारंपरिक दिवा आपले घर किंवा खोल्या उजळवत नसला, तरी तो आपले सण, प्रार्थना व कौटुंबिक आनंद नक्कीच प्रकाशित करत आहे. यातून मनाला शब्दांत न सांगता येणारा आनंद मिळतो. दिव्याचे हेच महत्त्व आपण पुढच्या पिढीपर्यंतही पोहोचवले पाहिजे.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *