पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू

पुणे: जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. तांदूळवाडीतील दादा पाटीलनगर परिसरात एका घरात आई आणि मुलाचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत रमा विजय गावडे (वय ४१) आणि त्यांचा मुलगा विवेक विजय गावडे (वय १७) यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमा गावडे यांचे पती विजय गावडे हे बारामती एमआयडीसीमधील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. शुक्रवारी सकाळी जेव्हा ते घरी परतले, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी पत्नीला आणि मुलाला अनेकदा आवाज दिला, परंतु आतून कोणतीही हालचाल झाली नाही. संशय आल्याने त्यांनी तात्काळ शेजारी राहणाऱ्या सूरज भीमराव शिंदे यांना बोलावले आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

 

घरात प्रवेश करताच त्यांना जे दृश्य दिसले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. मुलगा विवेक हा पत्र्याच्या अँगलला सुती दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होता. तर जवळच रमा गावडे या खिडकीजवळ जमिनीवर पाठीवर पडलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल नव्हती. विशेष म्हणजे, रमा गावडे यांच्या गळ्यावर काळसर व्रण उमटले होते, ज्यामुळे त्यांच्या मृत्यूभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाले आहे.

उपस्थित नागरिकांनी आणि कुटुंबीयांनी तातडीने दोघांनाही बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.

या घटनेमुळे गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. प्रथमदर्शनी हा प्रकार आत्महत्येचा वाटत असला, तरी आईच्या गळ्यावरील व्रण आणि दोन्ही मृतदेहांची स्थिती पाहता, हे घातपाताचे प्रकरण आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. वैद्यकीय अहवाल आणि शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेने बारामती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *