मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!

मुंबई: लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या जागेवरून झालेल्या वादातून एका ६३ वर्षीय दिव्यांग वृद्धाचा धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून खून केल्याची अत्यंत दुर्दैवी आणि भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना कशी घडली?
कॅजेटन पिरीस (वय ६३, रा. सांताक्रूझ) असे मृत दिव्यांग वृद्धाचे नाव आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी एका दुर्घटनेत एका पायापासून वंचिक झालेल्या कॅजेटन पिरीस हे क्रूझच्या (कोटर्सेस) साहाय्याने प्रवास करत असत. गुरुवारी ते माहिम रेल्वे स्थानकावरून सांताक्रूझ येथे जाण्यासाठी चर्चगेट-बोरिवली धीम्या लोकलच्या दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढले.

याच डब्यात अमजद शेख (वय ४८) हा तरुण बसला होता. कॅजेटन पिरीस यांनी तो दिव्यांग डबा असल्याने अमजदला ती जागा खाली करण्यास सांगितली. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्याने आरोपी अमजद शेखने संतापून कॅजेटन पिरीस यांना धावत्या लोकलमधून बाहेर ढकलून दिले. वांद्रे आणि माहिम रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.

सहप्रवाशांचे धाडस आणि आरोपीला अटक:
घटनेनंतर डब्यातील इतर सतर्क प्रवाशांनी तातडीने चेन पुलिंग (Alarm Chain) करून ट्रेन थांबवली आणि आरोपी अमजद शेखला पकडत वांद्रे रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर लोहमर्ग पोलिसांच्या (GRP) स्वाधीन केले. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत कॅजेटन पिरीस यांना उपचारासाठी वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आरोपीची बचावात्मक अरेरावी:
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपी अमजद शेख याने उडवाउडवीची उत्तरे दिली. "मी अस्वस्थ होतो आणि डब्यात बसलेल्या कावळ्याला हुसकावत असताना चुकून कॅजेटन पिरीस यांना धक्का लागला आणि ते खाली पडले," असा बनाव त्याने रचला. मात्र, प्रत्यक्षदर्शी प्रवाशांच्या जबाबावरून पोलिसांचा हा दावा फेटाळण्यात आला असून, वांद्रे लोहमर्ग पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईतील लोकल प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.



शहर

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *