मुंबई: मंकी हिलवर युद्धपातळीवर दुरुस्ती, मुंबई–पुणे रेल्वेमार्ग सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वेची शर्थ

मुंबई: मुसळधार पावसामुळे दरड कोसळून नुकसान झालेल्या कर्जत-लोणावळा घाट विभागातील मंकी हिल परिसरात मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. रेल्वे वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी अभियंते, तंत्रज्ञ आणि शेकडो कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत.

मंकी हिल परिसरातील डोंगर उतार स्थिर करण्यासाठी १२ मीटर खोल स्टील अँकर बसविणे, लोखंडी जाळ्यांचे संरक्षण कवच (स्टील नेट) उभारणे, गॅबियन संरचना आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दरड कोसळण्याचा धोका कमी करण्याचे काम सुरू आहे. रेल्वेमार्ग सुरक्षित करण्यासाठी विशेष यंत्रसामग्रीचीही मदत घेतली जात आहे.

अलीकडील मुसळधार पावसानंतर घाट विभागात दरड कोसळल्याने मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांवर परिणाम झाला होता. काही गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले होते. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात येत असून काही महत्त्वाच्या गाड्यांची वाहतूकही पूर्ववत करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, काम पूर्ण होईपर्यंत आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हवामानाचा सतत आढावा घेत दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून लवकरच संपूर्ण रेल्वे वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *