Mumbai : मुंबईत ड्रग्ज पार्टीचा धक्कादायक प्रकार; नेस्कोतील व्हिडिओ व्हायरल, ‘कल्याण कनेक्शन’ समोर

Mumbai :  गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य संशयित आनंद पटेल याला अटक केली आहे. ड्रग्ज पुरवठ्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

आज पहाटे सुमारे साडेपाचच्या सुमारास पोलिसांनी कल्याणमधील वायले नगर परिसरात आनंद पटेलच्या घरावर छापा टाकला. यावेळी आरोपी घरातच होता; मात्र त्याने दरवाजा उघडण्यास टाळाटाळ केल्याने पोलिसांना दरवाजा उघडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अखेर खडकपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

दरम्यान, नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या कॉन्सर्टनंतरचे काही धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओंमध्ये पार्किंग परिसरात काही तरुण-तरुणी अर्धनग्न अवस्थेत नशा करताना दिसत असून, काही जण दारू व सिगारेटचे सेवन करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. याशिवाय, काहींनी नशेतच वाहन चालवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तपासादरम्यान ‘जेबी’ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांनी इव्हेंटला येताना कॅबमध्येच ‘एमडीएमए’ (MDMA) या ड्रग्जचे सेवन केले होते. काहींनी दोन गोळ्या घेतल्यामुळे त्यांना ओव्हरडोस झाला आणि प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. हे ड्रग्ज कल्याण परिसरातून पुरवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी वनराई पोलिसांनी वेगाने कारवाई करत नेस्कोशी संबंधित तीन जण, एक सुरक्षा रक्षक आणि दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. आरोपींकडून ६ ते ७ ड्रग्ज टॅबलेट्स जप्त करण्यात आल्या असून, ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपीलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

या संपूर्ण प्रकरणात १५ ते १६ विद्यार्थ्यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, पोलीस आता या ड्रग्ज रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *