Mumbai : प्रभादेवीत ‘डबल डेकर’ पूल उभारणीला वेग; १०० वर्षे जुन्या रेल्वे पुलाचे पाडकाम निम्म्यावर, शिवडी-वरळी कनेक्टरला गती

Mumbai : प्रभादेवी रेल्वे उड्डाणपुलाच्या जागी डबलडेकर पुलाचे गर्डर उभारणी जुलैअखेर पूर्ण करण्याचे नियोजन महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल ) केले आहे. पश्चिम रेल्वे हद्दीतील पुलाचे गर्डर रविवारी झालेल्या ब्लॉकमध्ये हटवून निम्मे काम पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेवरील गर्डर हटवण्यासाठीचा ब्लॉक रेल्वे प्रशासनाने मंजूर केला आहे. यामुळे पुलाचे गर्डर हटवण्याचे काम याच महिन्याअखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे.

सप्टेंबरपासून वाहतूक बंद
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) शिवडी-वरळी कनेक्टरचे काम सुरू आहे. प्रकल्पात १०० वर्षे आयुर्मान असलेल्या प्रभादेवी पूल पाडून त्याजागी डबलडेकर पूल उभारण्यात येणार आहे. पाडकाम करण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. ब्रिटिशकालीन प्रभादेवी रेल्वे उड्डाणपुलाचे रुळांवरील गर्डर काढण्यासाठी रविवारी मध्यरात्रीनंतर १२.३० ते सकाळी ६.४५ पर्यंत विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला होता.

ब्लॉक वेळेत ३२ मीटर स्पॅनचे २ गर्डर हटवण्यात आले आहेत. प्रत्यक्ष स्थळावर क्रेन नेण्याचा रस्ता कमी रुंदीचा होता. त्यात १०० वर्षांहून अधिक जुने गर्डर हटवण्यासाठी नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे आव्हान होते. एकाचवेळी रुळांवरील ओव्हरहेड वायरसह अन्य यंत्रणेचे स्थलांतरण आणि गर्डर हटवण्याचे काम शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीपणे पार पडले, असे प. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नाराजीनंतर कामाला वेग
मध्य रेल्वेच्या रुळांवरील गर्डर हटवण्यासाठी साडे तीन तासांचे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक ब्लॉक मंजूर करण्यात आले आहेत. येत्या आठवड्यापर्यंत मध्य रेल्वेवरील पूलाचे गर्डर देखील हटवण्यात येईल, असे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रभादेवी पुलाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. यामुळे पुलाचे पाडकाम वेगाने पूर्ण करावे आणि डबलडेकर पुलाची गर्डर उभारणी करण्याच्या सूचना महारेलला दिल्या आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *