पाठलाग केला, परत घरात घुसून धमकावलं, धाराशिवच्या कलाकेंद्रावर सशस्त्र दरोडा, 9 लाख लंपास

Dharashiv : धाराशिव येथे पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडली आहे. कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्राच्या संचालिकांच्या घरी सहा जणांनी घुसखोरी करून पिस्तूल व लोखंडी सुरा दाखवत तब्बल 9 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोराखळी येथील रहिवासी आणि कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्राच्या संचालिका निर्मला मोहन जाधव या कुटुंबासह त्यांच्या कलाकेंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर राहत आहेत. त्यांच्यासोबत रेखा किशोर शिंदे व शिवम उर्फ गळ्या गंगावणे हेही राहत होते.

नेमकं काय घडलं?

निर्मला जाधव यांच्या तक्रारीनुसार, रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्या, रेखा शिंदे, शिवम गंगावणे आणि चालक शशिकांत मुंडे हे बार्शी येथील कलाकेंद्र बंद करून इनोव्हा कारने चोराखळी येथे परतत होते. त्यावेळी एका चारचाकी वाहनाने पाठलाग केल्याचा संशय त्यांना आला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्या घरी पोहोचल्या असता घराचे दार उघडे असतानाच तोंडाला कापड बांधलेले सहा जण आत घुसले.

दोघांनी शिवम गंगावणे याला जमिनीवर दाबून धरले तर एकाने निर्मला जाधव यांच्या डोक्याला पिस्तूल लावले. दुसऱ्या आरोपीने रेखा शिंदे यांच्या गळ्याला लोखंडी सुरा लावून धमकावले. आरडाओरड थांबवण्यासाठी आरोपींनी तिघांच्या डोळ्यांत चटणी टाकून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

9.51 लाखांची चोरी

आरोपींनी निर्मला जाधव आणि रेखा शिंदे यांच्या अंगावरील सुमारे 121.600 ग्रॅम वजनाचे अंदाजे 6 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चार मोबाईल फोन सुमारे 3 लाख 49 हजार रुपये किंमतचे तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण 9 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

पूर्वीपासून वादाची पार्श्वभूमी

तक्रारीनुसार, तेरखेडा येथील सचिन उर्फ प्रशांत बापू पवार आणि महादेव विठ्ठल घुले यांची काही महिन्यांपासून कलाकेंद्रावर ये-जा होती. आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्यानंतर सचिन पवार यांनी घरफोडीची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

दरोड्यावेळी समोर उभ्या असलेल्या आरोपींपैकी एक जण सचिन उर्फ प्रशांत पवार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जीवाला धोका असल्याने तात्काळ ओळख उघड केली नाही असेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात सचिन पवारसह पाच अज्ञात आरोपी आणि महादेव घुले यांच्या सहभागाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांची तपासाची दिशा

घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *