पुणे: गॅस तुटवडा १४ किलोची गॅस जोडणी बंद; १० किलोचा १६८० रुपयांचा महागडा पर्याय नागरिकांच्या माथी!

पुणे: भविष्यात गॅसचा तुटवडा भासू नये म्हणून इराण-अमेरिका युद्धादरम्यान बंद करण्यात आलेली १४ किलो घरगुती गॅस सिलिंडर जोडणी अद्याप सुरू केलेली नाही. मात्र, तब्बल १६८० रुपयांत १० किलोचा गॅस सिलिंडर घेण्यास कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे गॅस तुटवड्याच्या नावाखाली महागड्या गॅस जोडणीचा पर्याय देऊन सामान्यांची आर्थिक लूट सुरू का केली जात आहे, असा संतप्त सवाल पुणेकरांकडून उपस्थित केला जात असून, ती त्वरित थांबवून १४ किलो नवी गॅस जोडणी त्वरित सुरू करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

इराण-अमेरिकेदरम्यानच्या वाढत्या तणावाच्या व युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसचा जागतिक पुरवठा बाधित होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून आणि भविष्यात तुटवडा भासू नये म्हणून, सुरुवातीला केंद्र सरकार व तेल कंपन्यांकडून १४ किलोच्या घरगुती सिलिंडरची नवीन गॅस जोडणी देणे बंद करण्यात आले होते. यामुळे नोकरीनिमित्त, रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी पुण्यात नवीन आलेले, तसेच गॅस जोडणीची गरज असणाऱ्या नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

मध्यंतरीच्या काळात १० किलोची जोडणी देणे सुरू करण्यात आले आहे. हा सिलिंडर महाग असल्याने सर्वसामान्य नागरिकांना ही जोडणी घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. या जोडणीवर कितीही सिलिंडर रिफिल करता येत असतील, तर याचा अर्थ पुरवठा सुरळीत आहे; मग तरीही १४ किलोची जोडणी अजूनही बंद का ठेवण्यात आली आहे, असा सवाल गरजू नागरिक विचारत आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात ३८ लाखांहून अधिक घरगुती गॅस जोडण्या सक्रिय असून विविध गॅस एजन्सींच्या माध्यमातून लाखो कुटुंबांपर्यंत सिलिंडरचा पुरवठा केला जातो.

१४ किलो सिलिंडरपेक्षा १० किलोच्या सिलिंडरची किंमत दुप्पट

१० किलोच्या नवीन गॅस जोडणीसाठी ग्राहकांना तब्बल ५ हजार ३०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत आहे, तर १० किलोच्या एका सिलिंडरसाठी तब्बल १ हजार ६८० रुपये मोजावे लागत आहेत. ज्यामुळे ग्राहकांना ४ किलो गॅस कमी मिळत असूनही अतिरिक्त ७३५ रुपये जास्त मोजावे लागत आहेत. महागाईच्या काळात आधीच सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडले आहे. त्यात आता या नवीन गॅससाठी दुप्पट पैसे मोजावे लागल्याने दोन वेळचे अन्न शिजवणेही सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *