मुंबई:  आधी सांगा कर्जतच्या फार्महाऊससाठी किती झाडं तोडली? टोरेंट प्रकल्पावरून विरोध करणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजपचा खोचक सवाल!

मुंबई: रायगड जिल्ह्यातील कर्जत (Karjat) परिसरातील टोरंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी होणाऱ्या कथित वृक्षतोडीवरून सध्या राजकारणात मोठा गदारोळ उडाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी या वृक्षतोडीविरोधात तीव्र आक्रमक भूमिका घेत थेट घटनास्थळाचा दौरा केला आणि राज्य सरकारवर पर्यावरण विनाशाचा आरोप केला. या सर्व घडामोडींदरम्यान, भारतीय जनता पक्षाने (BJP) आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत त्यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत पलटवार केला आहे.

टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडली जात असल्याचा दावा करत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रकल्पासाठी कागदोपत्री काही हजार झाडे सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात चार ते पाच लाख झाडांची कत्तल होण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला वाळवंट करण्याचे ठरवले आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी कर्जत येथे प्रत्यक्ष जाऊन स्थानिकांशी संवाद साधला आणि वृक्षतोडीविरोधात आवाज उठवला.

आदित्य ठाकरेंच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत भाजपचे प्रवक्ते व नेते नवनाथ बाम यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. एका बाजूला विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करायचा आणि दुसरीकडे स्वतःच्या सोयीसाठी पर्यावरणाकडे दुर्लक्ष करायचे, असा टोला त्यांनी लगावला. भाजपने आदित्य ठाकरेंना थेट सवाल करतानाम्हटले की, "तुम्ही कर्जतच्या प्रकल्पातील वृक्षतोडीवर मोठे आक्रमक होऊन बोलत आहात, मग आधी हे स्पष्ट करा की कर्जतमध्येच असलेल्या तुमच्या स्वतःच्या फार्महाऊससाठी किती झाडे तोडण्यात आली होती?"

तसेच, विरोधकांचा हा केवळ विकासाला विरोध करण्याचा अजेंडा असून 'लावसा' प्रकरणापासूनचा इतिहास पाहता पर्यावरण प्रेमाचा बुरखा झाकून विरोध करणे हे ठाकरेंचे जुने तंत्र असल्याचे भाजपने म्हटले आहे. टोरेंट प्रकल्पासारखे ग्रीन एनर्जी आणि प्रदूषण कमी करणारे प्रकल्प राज्याच्या हिताचे असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी विरोध केला जात असल्याचे सांगत भाजपने आदित्य ठाकरेंच्या भूमिकेला दुटप्पी ठरवले आहे. या वादानंतर आता कर्जतमधील वृक्षतोड आणि राजकीय नेत्यांची भूमिका या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *