खाकीची दोन विपरित रूपे! तस्कराचा पाठलाग करताना कर्तव्यदक्ष पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; तर दुसऱ्या बाजूला पुणे पोलिसातील कॉन्स्टेबलच निघाला गांजा तस्कर!

महाराष्ट्र पोलिस दलाची प्रतिमा आणि कर्तव्यतत्परता याविषयी नेहमीच चर्चा होत असते, परंतु एकाच वेळी समोर आलेल्या दोन अत्यंत विचलित करणाऱ्या घटनांनी संपूर्ण पोलिस दलात आणि समाजात खळबळ उडवून दिली आहे. एका बाजूला अमली पदार्थांच्या तस्कराविरोधात कारवाई करताना आणि पळून जाणाऱ्या तस्कराचा पाठलाग करताना एका कर्तव्यदक्ष आणि धाडसी पोलिस कर्मचाऱ्याने आपले प्राण गमावले आहेत. तर दुसऱ्या बाजूला, याच खाकी वर्दीला काळीमा फासत पुणे शहर पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलला थेट १२ किलो गांजाची तस्करी करताना रंगेहाथ अटक करण्यात आल्याचा लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे.

पहिले रूप: तस्कराचा पाठलाग करताना जावेद बागसिराज यांना वीरमरण:

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असलेले अंमलदार जावेद बागसिराज (वय ४०) यांना रविवारी (दि. २५) रात्री संत तुकारामनगर परिसरात एमडी (मेफेड्रॉन) विकण्यासाठी काही तस्कर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले, मात्र त्याचा दुसरा साथीदार पळून जाऊ लागला. त्या पळणाऱ्या तस्कराचा पाठलाग करण्यासाठी जावेद बागसिराज यांनी शर्थीने धाव घेतली. सततच्या पाठलागामुळे त्यांना प्रचंड ताण आला आणि अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते जागेवरच कोसळले. सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. २०१० मध्ये पोलीस दलात दाखल झालेले बागसिराज हे अतिशय प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने पोलीस दलावर शोककळा पसरली असून सोमवारी कसबा पेठ येथील कब्रस्तानात त्यांच्यावर अश्रूूंच्या पूर्ण वातावरणात दफनविधी पार पडला.

दुसरे रूप: खाकीला कलंक, १२ किलो गांजासह पुणे पोलीस कॉन्स्टेबल अटकेत:

एकीकडे जावेद बागसिराज यांनी प्रामाणिकपणाची आणि धैर्याची पराकोटी दाखवून आपले प्राण अर्पण केले, तर दुसरीकडे पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल नितीश ज्ञानू शिंदे हा स्वतःच अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे उघडकीस आले. नितीन शिंदे हा मागील दीड वर्षांपासून पुणे शहर पोलिसांच्या विश्रामबाग वाहतूक विभागात नेमणुकीस होता. तो ओडिशा राज्यातून तब्बल १२ किलो गांजाचा साठा घेऊन तेलंगणा मार्गे तस्करी करत होता. तेलंगणातील वारंगल जिल्हा पोलिसांना याबद्दल गुप्त माहिती मिळाली असता, त्यांनी सापळा रचून बसथांब्यावर संशयितरीत्या फिरणाऱ्या नितीन शिंदे याची कसून झडती घेतली. त्याच्याकडे १२ किलो गांजा आढळून आल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या. या प्रकारामुळे पुणे पोलीस दलाची प्रचंड बदनामी झाली असून खाकी वर्दीतील भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *