पुस्तक परीक्षण:‘व्रत आणि इतर कथा’मध्ये ब्यारी समाजाचे वास्तववादी चित्रण; निरागस नजरेतून समाजातील विसंगतींवर ठेवलेले बोट!

कन्नड साहित्याचा इतिहास अरुणोदय(१८००-१९२०), नवोदय (१९२०-५०), प्रगतिशील (१९५०-६०), नव्य (१९६०-७०) आणि नंतर नव्योत्तर आणि बंडाय अशा प्रवाहांनी वाटचाल करत गेला आहे. यातील विविध प्रवाहांशी मराठी वाचकांचा परिचय करून देण्याचे सर्वात मोठे श्रेय नि:संशय डॅा. उमा कुलकर्णी यांना जाते. साधारणपणे मराठी वाचकांना शिवराम कारंत, भैरप्पा आणि गिरीश कार्नाडांसारख्या लोकप्रिय लेखकांची ओळख असते. परंतु त्यापलीकडेही कसदार कन्नड साहित्यिकांचा परीघ खूप मोठा आहे. फकीर मुहम्मद कटपाडी हे अशाच लेखकांपैकी एक. कर्नाटक किनारपट्टीवरच्या उडुपीजवळील कटपाडी गावात जन्मले. उर्दू, कन्नड भाषेत शिकले. ‘ब्यारी’ ही त्यांची बोली भाषा; तुळूसारखीच. ते विचारांनी सुधारणावादी आणि कृतिशील असून त्यांचे नोंबु, दज्जाल असे अनेक कथासंग्रह गाजले आणि विविध कथांचे नाट्यरूपांतरण व दूरदर्शनवर सादरीकरणही झाले आहे. लेखकाच्या विविध कथासंग्रहांतील (‘नोंबु’सह)निवडक तेरा कथांचे संकलन असणारे पुस्तक, असे ‘व्रत आणि इतर कथा’ या पुस्तकाचे स्वरूप आहे. हे पुस्तक म्हणजे दक्षिण कन्नडातील ब्यारी मुस्लिमांच्या परंपरा, संघर्ष , सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरे आणि समाजजीवानाचे चित्रण करणारा कथासंग्रह आहे. स्वतःशी प्रामाणिक राहून केलेले निवेदन आणि कथानकाच्या मांडणीतील सरलता वाचकांना इतरत्र क्वचितच अनुभवता येते. ‘व्रत’ ही रमजानच्या महिन्यात घडणारी गोष्ट. उपवासासारख्या साध्या गोष्टीतून समाजातील आर्थिक विषमता, विवाहात ‘स्त्री’च्या इच्छेला नसणारे स्थान, पिळवणुकीच्या गर्तेतही समाजावर असणारा धर्माचा पगडा, मृत्यूनंतरच्या स्वर्गातील जीवनाचे प्रचंड आकर्षण अशा अनेक गोष्टींना स्पर्श केला आहे. या कथेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या अद्दू नावाच्या मुलाला पडणारे निर्व्याज प्रश्न; म्हटले तर भाबडे आहेत, म्हटले तर, तत्ववेत्त्याचे! या अद्दूच्या मित्राकडे सुबत्ता असते, म्हणजे स्वर्गात जे असतं, ते जिवंतपणीच सगळे काही असतं. अशी सुबत्ता, धर्माचे नेकीने पालन करणाऱ्या आपल्या आईवडलांकडे नाही, हे त्याला सतत जाणवते. लहान मुलांनी उपवास करू नये, असा त्यांच्याकडचा संकेत असतो. उपवास करून मृत्यू आला, तर स्वर्ग मिळतो. या निष्पाप समजुतीपोटी अद्दू हट्टाने ‘रोजे’ पाळून मृत्यूमुखी पडायचे ठरवतो. यात त्याला नुसताच उपवास घडतो आणि शेवटी वाटते, की असे उपवास तर आपल्याला नेहमीच घडतात. ‘यात विशेष असे काय?’ हा त्याचा प्रश्न मन हेलावून टाकणारा आहे. कथानकातील चढउतार वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. ‘आक्काचं लग्न आणि मेंढरू’ ही कथाही अशीच उत्कंठावर्धक आहे. मजीद नावाच्या लहान मुलाची बहीण रूपाने बेतास बात असते. मजीदच्या घरचे लोक सासरच्या मंडळींना फसवून तिला उजवू पाहतात. त्यावेळी लग्नघरात मेजवानीसाठी एक कोवळे मेंढरू आणले जाते. सुरुवातीला त्या मेंढराचे झालेले लाड आणि मेजवानीसाठी झालेली खांडोळी पाहून कोवळ्या मजीदच्या मनात नकळतपणे मोठ्या बहिणीची तुलना मेंढराशी होते. या कथेत मजीदच्या मनातली आंदोलने अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीने चितारली आहेत. आपल्या तेरा वर्षांच्या मुलीला बुरख्यात कोंबणारा बाप आणि बुरख्यापासून होता होईल तेवढे, परावृत्त करू पाहणारी, तसे तोकडे प्रयत्न करणारी आई आणि बुरखा लादली गेलेली मुलगी यांची गोष्ट असलेली ‘घुसमट’ ही कथा. बुरखा वापरण्यास सुरुवात केल्यादिवशीच मूक प्राण्यांसकट इतरांचा आपल्याबद्दल बदलेला दृष्टिकोन या मुलीला जाणवतो. ती घुसमट या कथेत अतिशय प्रभावीपणे व्यक्त होते. एकाच घरातल्या नातेसंबंधांतले हेवेदावे, कटू अनुभव, दावणीला बांधलेले स्त्रियांचे आयुष्य, माणसांच्या वागण्यातला दुटप्पीपणा, नदीच्या पुरात वाहून जाण्याची शक्यता निर्माण होते खरी, पण पूर परिस्थिती निवळताच माणसाचा कद्रूपणा, क्षुद्र मनोवृत्ती पूरापेक्षाही जास्त वेगाने उफाळून येते. या सगळ्यांचे दर्शन ‘पूर’ या कथेत होते. त्यातून पुराच्या पाणासारखाच माणसाचा स्वभाव ‘लहरी’ आणि थांगपत्ता न लागू देणारा आहे, हे वास्तव पुढे येते. कथासंग्रहातील सर्वच कथा उल्लेखनीय आहेत. त्यामागे सखोल चिंतन आहे आणि गहन विचार आहे. अनेकवेळा कथांचे स्वरूप रोजच्या जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे आहे, कुठे मृत्यूसाठी, तर कुठे मृत्यूनंतर कराव्या लागणाऱ्या अंत्यविधींसाठीही या संघर्षातून सुटका नाही. तरीही विषयांची हाताळणी सर्वसामान्य वाचकाला भावेल, अशी सुटसुटीत आहे. बहुतेक कथांमध्ये लहान मुलांच्या निरागस चष्म्यातून प्रश्नांची थेट मांडणी करणारी योजना आहे. धर्मश्रद्धांच्या नावाखाली उपासमारीचे उदात्तीकरण, मशिदीच्या प्रेसिडेंट लोकांकडून देणगीच्या नावाखाली होणारी गरीबांची पिळवणूक, मदरशातील धार्मिक शिक्षणाचा आग्रह, गोवंशहत्या, तलाक, बहुपत्नीत्व, बुरखासक्ती, अनेक मार्गांनी होणारे स्त्रियांचे शोषण, समाजातील अभावग्रस्तता, तथाकथित मुस्लीम पुरोगाम्यांच्या वागण्यातील अंतर्विरोध अशा वर्मांवर हे पुस्तक नेमके बोट ठेवते. फकीर मुहम्मद कटपाडी कोणतेही निष्कर्ष वाचकांवर लादत नाहीत. ते कथेतील पात्राच्या जागी, वाचकाला उभे करतात आणि विचारप्रवृत्त करतात. त्यांच्या कथा वाचून संपल्यावरही त्यातील व्यक्तिरेखा मनात रेंगाळत राहतात. किनारपट्टीवरील ब्यारी बोलीत, धर्माच्या चौकटीत अडकलेल्या माणसांच्या त्या व्यथा, कुठल्याही एका समाजाच्या न राहता, समस्त मानव जातीच्याच व्यथा आहेत. व्यथा मांडणाऱ्या या कथा, कोणताही उपदेश करत नाहीत. फक्त आरसा दाखवतात. मुस्लीम वर्गव्यवस्थेतील विरोधाभास उघडे पाडणारे लिखाण करण्यासाठी कटपाडी यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला आहे. तरीही धीरोदात्तपणे त्यांनी दमदार लेखन चालू ठेवले. त्यासाठी लेखक नितांत आदरास पात्र आहेत. मूळ लेखनातले भावतरंग मराठी वाचकांपर्यंत पोहोचणे, हे उमाताईंच्या कौशल्यामुळे साधले आहे. हे लेखन प्रयत्नपूर्वक मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमाताईंना अभिवादन. (लेखक बेंगलोरस्थित पोटविकार तज्ञ असून कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, बेंगलोर विभागाचे उपाध्यक्ष आहेत.)

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *