कोल्हापूर: केवळ दोन तासांच्या घोडागाडी सफरीसाठी मोजतात २५ हजार रुपये! राधानगरीतील तरुणांनी खिशातले पैसे खर्चून अशी जपली अनोखी परंपरा

कोल्हापूर: परंपरेचा अनमोल वारसा आणि संस्कृती अत्यंत उत्साहात जोपासणारे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील दसरा उत्सव आजही त्याच्या अनोख्या आणि पारंपरिक थाटात साजरा केला जातो. काळाच्या ओघात आधुनिकतेचे वारे वाहत असले, तरी आपल्या गावाची जुनी संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा नवीन युवा पिढीने आजही तितक्याच जिव्हाळ्याने आणि उत्साहाने जीवंत ठेवली आहे. ग्रामदैवत अंबाबाई, ज्योतिबा, लिंगोबासह परिसरातील सर्व देवांचे दर्शन घेण्यासाठी पूर्वी शेतकरी बैलगाड्या घेऊन जात असत; परंतु आता त्या जुन्या बैलगाड्यांची जागा घोडागाड्यांनी घेतली असून, केवळ दोन ते तीन तासांच्या सफरीसाठी येथील तरुण स्वतःच्या खिशातून तब्बल २० ते २५ हजार रुपये खर्च करून अनोखी परंपरा अखंड ठेवत आहेत.

बैलगाड्यांपासून घोडागाडीपर्यंतचा प्रवासाचा इतिहास:

सुमारे ५० ते ६० वर्षांपूर्वी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बळीराजा आपली सजवलेली बैलजोडी घेऊन गावातील ग्रामदैवत अंबाबाई, ज्योतिबा, लिंगोबासह परिसरातील सर्व प्रमुख देवांच्या दर्शनासाठी राधानगरीच्या मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होत असे. त्या काळी ग्रामीण भागात वाहतुकीचे आणि प्रवासाचे एकमेव व प्रमुख साधन बैलगाडीच असल्यामुळे, सर्व शेतकरी आपापल्या बैलगाड्यांमध्ये बसून किंवा जोड्या जुळवून गावातून दिमाखात फेरफटका मारत असत. काळ बदलत गेला तसे या प्रथेचे स्वरूप देखील बदलले; कधी सुट्टे बैल पळवण्याची तर कधी रडे किंवा म्हैस पळवण्याची प्रथा सुरू झाली.

सांगली, सातारा आणि कर्नाटकातून मागवल्या जातात घोडागाड्या:

आजच्या आधुनिकीकरणाच्या युगात आणि शेतीमध्ये यंत्रांचा वापर वाढल्यामुळे ग्रामीण भागात बैलगाड्यांचे प्रमाण वेगाने रोडावले आहे. त्यामुळे मागील सुमारे दहा वर्षांपासून येथील उत्साही युवा पिढीने दसऱ्याच्या सणाला 'घोडागाडी' आणून ती राधानगरीच्या बाजारात पळवण्याची नवीन प्रथा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण उत्सवात कोणतीही स्पर्धा किंवा पैशांची शर्यत नसते. केवळ परंपरेचे जतन करण्यासाठी सांगली, वाळवा, शिरोळ, जयसिंगपूर, कळंबा, कागल, हुपरी, कापशी तसेच शेजारील कर्नाटक राज्यातून अवघ्या दोन ते तीन तासांच्या कालावधीसाठी तब्बल २० ते २५ हजार रुपये मोजून घोडागाड्या भाड्याने किंवा पैशांचे पॅकेज देऊन राधानगरीत आणल्या जातात.

बाजारपेठेत फेऱ्या आणि थरारक सोहळा पाहण्यासाठी तुफान गर्दी:

राधानगरीच्या मुख्य बाजारपेठेत प्रत्येक घोडागाडीच्या १० ते १२ दिमाखदार फेऱ्या मारल्या जातात. हा अत्यंत थरारक, देखणा आणि संस्कृतीची साक्ष देणारा क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील तरुण, आबालवृद्धांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना गर्दी करतो. जुनी परंपरा आज पूर्णपणे नव्या आणि आधुनिक रूपात पाहाव्यास मिळत असून, येथील तरुणांची ही आपुलकी आणि संस्कृतीबद्दलची निष्ठा संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *