छत्रपती संभाजीनगर: नवरात्रीच्या अंधश्रद्धेपोटी जन्मदात्यांनीच केला मृत बाळाच्या स्पर्शाला इन्कार; अंतिम प्रवासात पालकच झाले परके!

छत्रपती संभाजीनगर: एकीकडे नवरात्रीचा जागर आणि मातृत्वाची आराधना सुरू असताना, दुसरीकडे मात्र जन्मदात्या आई-वडिलांनी आपल्या एक दिवसाच्या मृत बाळाला शेवटचा स्पर्शही नाकारल्याची घटना शहरात घडली. नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाच्या अंतिम प्रवासात जन्मदातेच परके झाले आणि स्मशानभूमीत काम करणाऱ्या अनोळखी हातांनीच त्या चिमुकल्याला मायेने कुशीत घेत अखेरचा निरोप दिला.

गजानन महाराज मंदिर परिसरातील खासगी रुग्णालयात सोमवारी रात्री महिलेने एका बाळाला जन्म दिला. मात्र, बाळंतपणातील गुंतागुंत वाढली आणि सकाळी नवजात अर्भकाने जगाचा निरोप घेतला. मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले आणि कामानिमित्त गेल्या वर्षभरापासून शहरात राहणारे हे जोडपे या घटनेने कोलमडून जाणे अपेक्षित होते. पण वास्तवाने वेगळेच वळण घेतले.

हात लावणार नाही
सध्या नवरात्र सुरू असल्याच्या कारणावरून या आई-वडिलांनी आपल्या मृत बाळाला हात लावण्यास नकार दिला. 'आमच्यामध्ये बाळ आणि बाळंतिणीला हात लावत नाहीत, त्यामुळे आम्ही कोणतेही विधी करू शकत नाही,' असे सांगत वडिलांनी सेंट्रल नाका स्मशानभूमीशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांनाच बाळाला नेण्यासाठी बोलावले.


मसनजोगी ठरले आधार
स्मशानभूमीत काम करणारे देवराज गायकवाड आणि रामेश्वर साबळे यांनीच दफन केले आले. या संपूर्ण वेळात जन्मदाता बाजूला तटस्थपणे उभा होता. दफनविधी पूर्ण झाल्यावर वडिलांनी फक्त वरून थोडे दूध टाकले आणि आल्या पावली ते तिथून निघून गेले. रोज मृत्यूला जवळून पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे डोळे मात्र पाणावले.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *