रत्नागिरी: काळाचा घाला! आई-वडिलांसोबत मासे पकडायला गेलेली एकाच कुटुंबातील ५ मुले खाडीत बुडाली

रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील नाणार-इंगळवाडी हद्दीत रविवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. आई-वडिलांसोबत खाडीत मासे पकडण्यासाठी गेलेली एकाच कुटुंबातील पाच लहान मुले पाण्याच्या खोल पात्रात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, इंगळवाडी येथील रहिवासी असलेले जुनेद भाटकर आणि त्यांची पत्नी हिना हे आपल्या मुलांसोबत रविवारी दुपारी परिसरातील खाडीमध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते. आई-वडील खाडीच्या काठावर किंवा पात्रात कामात मग्न असताना, दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास लहान मुले खेळत असताना पाण्याच्या प्रवाहातील एका खोल खड्ड्याचा (खोल पात्राचा) मुलांना अंदाज आला नाही. खड्डा खोल असल्यामुळे एकापाठोपाठ एक लहान मुले खाडीच्या खोल पाण्यात ओढली गेली आणि बुडाली.

मुलांचा आरडाओरडा ऐकून आणि प्रकार लक्षात आल्यावर आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ मुलांना वाचवण्यासाठी आक्रोश करत पाण्यात धाव घेतली. त्यांच्या मदतीसाठी आजूबाजूचे स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारही तातडीने धावून आले. सर्वांनी मिळून मुलांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

या दुर्दैवी घटनेत मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६), जुहेरिया जुनेद भाटकर (वय ९), बुशिरा जुनेद भाटकर (वय ११) आणि माहिरा जुनेद भाटकर (वय १५) ही भावंडे पाण्यात ओढली गेली. सुदैवाने, यातील एका लहान मुलीला उपस्थितांनी आणि ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढून वाचविण्यात यश आले. मात्र, इतरांना वाचवण्यात अपयश आले.

घटना समजताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस, ग्रामस्थ आणि स्थानिक मच्छीमारांच्या संयुक्त सहकार्याने युद्धपातळीवर बचाव व शोधकार्य सुरू करण्यात आले. या शोधकार्यादरम्यान मोहम्मद जुनेद भाटकर, जुहेरिया जुनेद भाटकर आणि बुशिरा जुनेद भाटकर या तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना व ग्रामस्थांना यश आले. मात्र, १५ वर्षीय माहिरा भाटकर हिचा शोध अजूनही सुरू असून यंत्रणा तिचा शोध घेत आहे.

दहावीत शिकत होती माहिरा: खाडीपात्रात बेपत्ता झालेली १५ वर्षीय माहिरा भाटकर ही सर्व भावंडांमध्ये मोठी होती. ती सध्या दहावीच्या वर्गात शिकत होती. ती शिक्षणासाठी राजापूर येथे वास्तव्याला असते. मात्र, सुटी असल्यामुळे ती आपल्या घरी आली होती आणि या दुर्दैवी घटनेची शिकार झाली. एकाच कुटुंबातील एवढ्या लहान मुलांवर काळाने घाला घातल्यामुळे संपूर्ण परिसरात व गावात मोठी शोककळा पसरली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *