एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्ग काढण्याची केली मागणी

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पुण्यासह मुंबई आणि राज्यातील इतरही भागात विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अस्वस्थतेबद्दल चिंता व्यक्त करत, राज्य सरकार आणि संबंधित प्रशासकीय संस्थांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांची तत्काळ दखल घ्यावी आणि त्यांच्याशी थेट संवाद साधत मार्ग काढावा, असे मोलाचे मत शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेत आपली कैफियत मांडल्यानंतर शरद पवार यांनी तातडीने सक्रिय भूमिका घेतली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट दूरध्वनीवरून (फोनवर) संपर्क साधत या संपूर्ण परिस्थितीवर चर्चा केली. मुख्यमंत्री त्या वेळी मुंबईत उपलब्ध नसल्याने, ते मुंबईत परतताच या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. गरज पडल्यास मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींसोबत विशेष बैठक घेऊन यावर तोडगा काढावा, असेही त्यांनी सुचवले.

एका बाजूने राज्य सरकार आणि त्यांचे प्रतिनिधी तर दुसरीबाजूने विद्यार्थी अशी भूमिका असताना जर योग्य सुसंवाद साधला नाही, तर प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होईल, असे सांगत शरद पवार यांनी कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी अर्थपूर्ण संवाद अत्यंत गरजेचा असल्याचे नमूद केले. तसेच, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी असून, सरकार यावर नक्कीच योग्य तो निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *