मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! डहाणू-बोरिवली मेमू ट्रेनच्या महिला डब्यात तरुणीवर हल्ल्याचा प्रयत्न; धाडसी मुलीने नराधमाला रोखले

मुंबई:लोकल ट्रेनच्या महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर प्राणघातक हल्ला करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. सकाळी पहाटे ५:१७ वाजताच्या सुमारास डहाणूवरून बोरीवलीकडे जाणाऱ्या डहाणू-बोरिवली मेमू (MEMU) ट्रेनमध्ये हा प्रकार घडला. मात्र, पीडित तरुणीने दाखवलेल्या अफाट धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, संबंधित २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणी डहाणू रेल्वे स्थानकावरून सकाळी ५:१७ वाजता सुटलेल्या बोरीवली मेमू लोकलच्या महिला डब्यात एकटीच प्रवास करत होती. ट्रेन वाणगाव रेल्वे स्थानकाजवळ आली असता, साधारण २७ ते २८ वयाचा एक अज्ञात तरुण महिलांच्या डब्यात शिरला. त्याने डब्यात आल्यावर तरुणीला ट्रेन कुठे पोहोचली आहे, अशी विचारणा केली.

तरुणी डब्यात पूर्णपणे एकटी असल्याची संधी साधत त्या नराधमाने अचानक तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्याचा आणि गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे सुरुवातीला घाबरली तरी, त्या तरुणीने अत्यंत धाडस दाखवले. तिने नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी जोरदार प्रतिकार केला आणि स्वतःचा बचाव करताना थेट हल्लेखोराच्या डोळ्यांत बोटे घातली. या अचानक झालेल्या प्रतिहल्ल्यामुळे आरोपी गोंधळला. या झटापटीदरम्यान तरुणीने तातडीने मोठा आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या डब्यांमधील इतर प्रवासी मदतीसाठी धावून आले. प्रवाशांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र वाणगाव स्थानकाजवळील या धावत्या ट्रेनमधील गोंधळाचा फायदा घेत संशयित आरोपी झटापट करून रेल्वेतून पसार झाला.

या घटनेनंतर घाबरलेल्या व संतापलेल्या प्रवाशांकडून आणि नागरिकांकडून रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर पीडितेने मदतीसाठी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तत्काळ मदत किंवा प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप केला जात आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलीस अज्ञात हल्लेखोराचा कसून शोध घेत असून, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *