विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा झालीच पाहिजे; एमपीएससी आंदोलनावरून ज्येष्ठ नेते शरद पवारांचा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी संवाद

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध मागण्यांसाठी आणि परीक्षा प्रणालीतील पारदर्शकतेसाठी पुण्यासह राज्यभरात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र अस्वस्थता असून, पुण्यासह मुंबई आणि राज्यातील अन्य भागांतही त्याचे पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार आणि संबंधित प्रशासकीय संस्थांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांची तातडीने नोंद घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधत मार्ग काढण्याची गरज असल्याचे परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आणि प्रतिनिधींनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन आपली कैफियत व मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. या सर्व परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत शरद पवार यांनी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट दूरध्वनीवरून (फोनवर) संपर्क साधला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची वस्तुस्थिती त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी अधिकारी, तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थी प्रतिनिधी अशी स्थिती असताना या दोन्ही बाजूंमध्ये जोपर्यंत योग्य संवाद होत नाही, तोपर्यंत कोणताही प्रश्न सुटत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.

कोणत्याही समस्येवर किंवा विवादावर तोडगा काढण्यासाठी अर्थपूर्ण व सकस सुसंवाद अत्यंत गरजेचा असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंबईत परतताच या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी, अशी विनंती त्यांनी केली. तसेच, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी जर आवश्यकता भासल्यास आपण स्वतःही या चर्चेत सहभागी होण्यास आणि सहकार्य करण्यास तयार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. या घडामोडींमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता मोठे राजकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले असून, सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *