सांगली: मध्य प्रदेशातून आणलेली ११ पिस्तुले आणि २२ काडतुसे जप्त, खानापूरमधील तिघांना बेड्या.

सांगली: मध्यप्रदेशातून एक-दोन नव्हे, तर ११ पिस्तुले आणि २२ काडतुसे आणलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आटपाडी तालुक्यात अटक केली. संशयित मयुरेश मनोहर आदाटे (वय २५, रा. मधुबन हॉटेल पाठीमागे, विटा, सध्या रा. बालाजीनगर, चाकण, पुणे), मारुती अशोक गुजले (वय २४, रा. जांभूळमळा, ता. खानापूर), वैभव ऊर्फ गब्बर संजय इंगळे (वय २१, रा. ताडाचीवाडी, ता. खानापूर) या तिघांना अटक केली आहे. तर मध्यप्रदेशातील 'पाजी' नामक पुरवठादाराचा शोध सुरू आहे.


स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक अवैध शस्त्र तस्करीबाबत तपास करत असताना सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक कुमार पाटील यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार मयुरेश आदाटे हा नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे कमरेला पिस्तुल खोचून थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने नेलकरंजी जाऊन मयुरेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तुल, दोन काडतुसे मिळाली. पिस्तुलाबाबत चौकशी केल्यानंतर त्याने मारुती गुजले हा थोड्या वेळापूर्वी खरसुंडी (ता. आटपाडी) येथे पिस्तुल दिल्याचे सांगितले. त्याला घेऊन पथक खरसुंडी येथे आले. तेव्हा तेथे थांबलेल्या मारूतीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीत तीन पिस्तुले, सहा काडतुसे मिळाली.

मारूतीकडे पिस्तुलाबाबत चौकशी केल्यानंतर त्याने वैभव इंगळे याच्याकडून पिस्तुले विकत घेतली असून त्याच्याकडे आणखी पिस्तुले, काडतुसे असल्याचे सांगितले. तो आटपाडीत गेल्याचे सांगितल्यामुळे पथकाने स्वादिष्ट मच्छिफ्राय सेंटर आटपाडी येथे त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कापडी सॅकमध्ये ७ पिस्तुले, १४ काडतुसे मिळाली. चौकशीत त्याने मध्य प्रदेशातील पाजी नामक व्यक्तीकडून सेंधवा येथून पिस्तुले आणल्याची कबुली दिली.


गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निशाणदार, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, अतुल माने, हणमंत लोहार, सुशील मस्के, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, अभिजीत ठाणेकर, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, रोहन घस्ते आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी कारवाईतील पथकाचे कौतुक केले.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *