वाशिममध्ये दुष्काळाचे भीषण वास्तव! पाण्याअभावी अडीच एकरांतील ३ हजार केळीच्या झाडांवर फेरला ट्रॅक्टर; तरुण शेतकऱ्याचा लाखो रुपयांचा खर्च मातीमोल!

राज्यात पावसाने ओढ दिल्याने आणि तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने बळीराजासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पावसाची तीव्र तूट आणि वाढत्या तापमानाचा थेट फटका आता फळबागांना बसू लागला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ढिल्ली गावातील एका तरुण शेतकऱ्याला आपल्या हाताशी आलेले पिक डोळ्यांसमोर जळून खाक होत असल्याने अत्यंत टोकाचे पाऊल उचलत अडीच एकरांतील संपूर्ण केळीची बाग स्वतःच्या ट्रॅक्टरने उद्ध्वस्त करावी लागली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.

विहीर आणि बोरवेल कोरडे पडल्याने मोठे संकट:

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ढिल्ली येथील तरुण शेतकरी उमेश मारकड यांनी गतवर्षी मोठ्या अपेक्षेने आणि कष्टाने अडीच एकर क्षेत्रामध्ये सुमारे ३ हजार केळीच्या रोपांची लागवड केली होती. काही दिवसांतच या बागेची काढणी सुरू होऊन हाती उत्पन्नाचे पैसे येतील, अशी त्यांना भक्कम आशा होती. मात्र, चालू हंगामात पावसाने पाठంచ दिल्याने ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्यांच्या शेतातील विहीर आणि बोरवेल पूर्णपणे कोरडेठाक पडले. पिण्यासाठी आणि बागेला देण्यासाठी पाणी उपलब्ध न झाल्यामुळे आणि कडक व वाढत्या तापमानामुळे केळीची पाने व झाडे पूर्णपणे जळून करपून गेली.

साडेतीन ते चार लाखांचा खर्च मातीमोल:

पाण्याअभावी केळीची झाडे सुकून नष्ट झाल्यामुळे बागेतून उत्पादन मिळण्याची सर्व शक्यता मावळली. रोपांची लागवड, खते, मजुरी आणि औषध फवारणी मिळून या संपूर्ण बागेसाठी उमेश मारकड यांचा सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचा खर्च झाला होता. हा सर्व खर्च वाया गेल्याने व हाती शून्य उत्पन्न आल्याने अखेर हताश झालेल्या शेतकऱ्याने आपल्या उभ्या बागेवर ट्रॅक्टर चालवून सर्व ३ हजार झाडे जमीनदोस्त केली. शासनाने या गंभीर दुष्काळी परिस्थितीची तातडीने दखल घेऊन फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *