पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पुणे: दौंड शहरात १ लाख ४० हजार रुपये किमतीचे सिगारेटचे बॉक्स दुचाकीवरून अचानक लंपास झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि. २८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सचिन पवार (वय २९, रा. माळेगाव, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पवार हे बारामती येथून सिगारेटची पाकिटे वितरित करण्यासाठी दौंड येथे आले होते. शहरात सिगारेट वितरित केल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून सिगारेटचे बॉक्स देण्यासाठी सिंधी मंगल कार्यालय परिसरातील एका दुकानात आले होते. दुकानदाराला सिगारेटचे बॉक्स देण्यासाठी त्यांनी आपली दुचाकी दुकानासमोर लावली आणि सिगारेटची पिशवी दुकानात देण्यासाठी गेले. दरम्यान, दुसरी एक सिगारेटची पिशवी दुचाकीच्या हँडलला लटकवलेली होती.

 

 

दुकानात सिगारेट देऊन संबंधित कर्मचारी परत दुचाकीजवळ आला असता, दुचाकीला लटकवलेली सिगारेटची पिशवी लंपास झाल्याचे त्याच्या लक्षात आले. या पिशवीत १ लाख ४० हजार रुपये किमतीचे ३२ सिगारेटचे बॉक्स भरलेले होते. सिगारेटच्या पिशवीचा परिसरात शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यामुळे सिगारेटचा माल असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची त्यांची खात्री झाली. सिगारेटची पिशवी चोरीला गेल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरटा ती पिशवी चोरताना स्पष्ट दिसत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार नितीन बोराडे करीत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *