भीमाकाठच्या गावांना अन् वाघोली परिसराला मोठा दिलासा! भामा आसखेड धरणातून सोडलेले पाणी अखेर वढू बंधाऱ्यात दाखल; पाणीपुरवठा पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा!

केसनंद (ता. हवेली) व भीमा नदीकाठच्या परिसरामध्ये निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भीमा नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या भीमा नदीकाठच्या गावांसह वाघोली पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भामा आसखेड धरणातून सोडण्यात आलेले पाणी अखेर पूर्ण क्षमतेने वढू बंधाऱ्यात दाखल झाले असून, त्यामुळे संपूर्ण परिसराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वाघोलीसह भीमाकाठच्या १ लाख नागरिकांचा पाणीप्रश्न सुटणार:

यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने भीमा नदीतील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली होती. परिणामी, भीमा नदीकाठच्या वढू, पेरणे, लोणीकंद, केसनंद, कोरेगाव भीमा, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, सांगवी या गावांसह वाघोली परिसरातील प्रादेशिक आणि स्थानिक नळ पाणीपुरवठा योजना ठप्प पडण्याच्या मार्गावर होत्या. विशेषतः वाघोलीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता. आमदार माउली कटके यांनी या प्रश्नावर जलसंपदा विभाग आणि संबंधित यंत्रणांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर भामा आसखेड धरणातून २,००० क्युसेक क्षमतेने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हे पाणी वढू बंधाऱ्यात साचल्याने वाघोली व लगतच्या परिसरातील सुमारे १ लाख नागरिकांना थेट दिलासा मिळणार आहे.

आमदारांचे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन:

वढू बंधाऱ्यात पाणी दाखल झाल्यानंतर स्थानिक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे समाधान व्यक्त होत असले, तरी भविष्यातील संभाव्य टंचाई विचारात घेता नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. शिरूर-हवेली मतदारसंघातील आमदार माउली कटके यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी सातत्याने प्रयत्न करून पाणी सोडवून घेतले. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा."

 

 



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *