मराठी भाषा गौरव दिन विशेष:दिग्गज मराठी लेखकांच्या व्यक्तिरेखांनी आज रिपोर्टिंग कसे केले असते हे सांगणारा प्रयोग

मराठी भाषेला अनेक दिग्गज मराठी लेखकांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेल्या काही विलक्षण व्यक्तिरेखांचे गारूड आजही मराठी मनावर आहे. या व्यक्तिरेखांनी आजच्या ताज्या बातम्यांचे रिपोर्टिंग कसे केले असते, अशी मांडणी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिव्य मराठीच्या या प्रयोगात केली आहे. पुलंनी मराठी माणसाला खळखळून हसवले. त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील अंतू बर्वा नाशिकच्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे वृत्तांकन करत आहे. संमेलने साहित्य संस्थांना घेऊ द्या, ते काम सरकारचे नाही अंतू बर्वा | नाशिक काय म्हणतोस... नाशिकक ‘इश्व’ मराठी संमेलन भरला हा? अरं, नाशिकक् काय आणि मेल्या कैलासाक् काय... आमचा काय संबंध? पण तिथे त्या व्यासपीठावर श्रीपाद भालचंद्र जोशींनी जे काय ‘तासल्यान’ ना, ते ऐकून अनेकांची तोंडं वाकडी झाली आसतली! जोशी म्हणताहेत, ‘अरे बाबांनो, ही संमेलनं भरवचा काय सरकारचं काम आहे? सरकारनं आपली लोकांची कामं करावीत, हे साहित्याचा लचांड कशाक गळ्यात मारून घेतास?’ बरोबरच की! सरकारक कामं कमी की काय? त्यांना साहित्यात नाक खुपसल्याशिवाय जेवण पचत नाही तेच खरे! ते जोशी म्हणताहेत, ‘सरकारला संमेलनं भरवायला 70 कोटी लागतात, आणि आम्ही साध्या साहित्य संस्था 7-8 कोटीत तोच उजेड पाडतो.’ म्हजे विचार करा, वरचे 60-62 कोटी गेले कुठे? ‘भुर्रर्र’ करून उडाले की काय? की कोणाच्या खिशातल्या भगदाडात पडले? आणि साहित्य संमेलनास मात्र फक्त २ कोटींची तावडी फेकून मारता. म्हणजे आमचाच माल अन‌् आमचेच हाल असेच झाले की हे. आमचे सामंत साहेब आणि प्रशासन जागरूक आहेत असे प्रमाणपत्रही दिलंय हो जोशींनी. पण जोशींचा मूळ मुद्दा काय, आम्ही जे मागितच नाही तेच सरकार आमच्या ताटात वाढतं हा! उद्या सरकार म्हणेल, ‘आम्ही तुमची अंत्ययात्रासुद्धा काढून देऊ’, अरे पण आम्हाला मरायचेच नसेल तर? कुसुमाग्रजांच्या ‘नवलाख तळपती दीप विजेचे’ या कवितेप्रमाणेच नाशिकच्या साहित्यपीठावर अ. भा. साहित्य संमेलनाचे ३ माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, उत्तम कांबळे, डॉ. सदानंद मोरे यांनी विश्व मराठी संमेलनाच्या प्रारंभाची ज्योत प्रज्वलित केली. अशा दुर्मिळ प्रसंगाला नाशिककरांनी उभे राहून दाद दिली. मराठी ‘ज्ञानभाषा’ झाल्याशिवाय गत्यंतर नाही याचे भान ठेवा त्या बोलीभाषांचा काय? तर जोशी साहेब म्हणताहेत, मराठीतले सगळे शब्द मुळात बोलीतूनच आलेत. जोपर्यंत तुम्ही बोलीभाषांना प्रतिष्ठा देत नाही, तोवर 90 टक्के व्यवहार साहित्याच्या बाहेरच राहील. तो मराठीत येईलच कसा? अभिजात दर्जा मिळाला तो प्राकृताला, सरकाराने काय केले? फक्त सह्या? पण दर्जा मिळाला हे महत्त्वाचे. यामुळे प्रत्येक मराठी माणसाला आपल्याला सगळ्यांनाच कायतरी मिळाल्यासारखा वाटते हो... पण मराठी ‘ज्ञानभाषा’ झाल्याशिवाय गत्यंतर नाही याचे भान ठेवा म्हणजे झाले!

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

1 thought on “मराठी भाषा गौरव दिन विशेष:दिग्गज मराठी लेखकांच्या व्यक्तिरेखांनी आज रिपोर्टिंग कसे केले असते हे सांगणारा प्रयोग

Leave a Reply to Molly2630 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *