डॉ. नरेश त्रेहन यांचा कॉलम:हृदयरोगासंबंधीची लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका

पूर्वी असा एक समज होता की, हृदयरोग फक्त वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरच होतो. पण आता ही विचारसरणी वास्तवापासून खूप दूर जात आहे. खरी परिस्थिती अशी आहे की, हृदयरोग आता वयाच्या तिसाव्या किंवा चाळिसाव्या वर्षांतच लोकांना गाठत आहे. माणूस आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात सर्वात जास्त सक्रिय असतो, असा हा काळ असतो. माझ्याकडे येणाऱ्या तरुण रुग्णांची संख्या वाढतेय, ही तर चिंतेची बाब आहेच. पण त्याहून मोठी चिंता म्हणजे या आजाराच्या कारणांकडे दीर्घकाळ होणारे दुर्लक्ष! उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉलची बिघडलेली पातळी आणि लठ्ठपणा हे घटक वर्षानुवर्षे हृदयरोगाचा धोका वाढवत असतात. पण यांची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. एखादी गंभीर समस्या समोर येते, तेव्हा बचावाची वेळ निघून गेलेली असते. भारतीयांची बदलती जीवनशैली हादेखील या समस्येचा एक मोठा भाग आहे. तासन्‌तास एकाच जागी बसून राहणे, व्यायामाचा अभाव, अपुरी किंवा अनियमित झोप, प्रक्रिया केलेले अन्न खाणे आणि तंबाखूचे सेवन... या सर्व गोष्टी मिळून मोठा धोका निर्माण करत आहेत. तरुण वर्ग याकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव ही वस्तुस्थिती बनली आहे. त्यातही नोकरदार तरुणांसाठी हा ताण अधिक आहे. त्यामुळे आरोग्याचा विचार करताना या मुद्द्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आजार प्रतिबंधक यंत्रणा आता आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनली पाहिजे. तरुण वयात रक्तदाब, शुगर किंवा कोलेस्टेरॉल तपासण्यासाठी लक्षणांची वाट पाहू नये. ज्यांच्या कुटुंबात आधीपासूनच हृदयरोगाचा इतिहास असलेल्यांची ओळख वेळेतच झाली पाहिजे. त्यांना योग्य तो सल्लाही मिळाला पाहिजे. कामाच्या ठिकाणी आरोग्याकडे कसे पाहिले जाते, या विचारातही आपल्याला बदल करावा लागेल. खूप वेळ काम करणे, सतत बसून राहणे आणि पुरेशी झोप न घेणे... या गोष्टी रोजच्या सवयी बनतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतोच. कामाच्या मधोमध थोडे चालणे, कर्मचाऱ्यांसाठी नियमित आरोग्य तपासणी ठेवणे आणि आरोग्याला पूरक वातावरण निर्माण करणे, यासाठी कंपन्या पुढाकार घेऊ शकतात. लोकांनी हृदयरोगाच्या लक्षणांबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. छातीत अस्वस्थता होणे, हुरहूर वाटणे, अचानक धाप लागणे, विनाकारण खूप घाम येणे, मळमळणे, चक्कर येणे किंवा हात, खांदे, पाठ आणि नव्‍ह्यासह जबड्यापर्यंत वेदना पसरणे... ही लक्षणे कधीही किरकोळ मानून दुर्लक्ष करू नका. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित वैद्यकीय मदत मिळणे हे जीवन वाचवणारे ठरते. प्रतिबंधात्मक वैद्यकीय शास्त्रामध्ये आता खूप प्रगती झाली आहे. त्यामुळे लक्षणे दिसण्यापूर्वीच हृदयरोगाचा धोका ओळखणे शक्य झाले आहे. यामुळे आजार गंभीर रूप धारण करण्याआधीच डॉक्टरांना योग्य ते उपचार सुरू करण्याची संधी मिळते. हृदयाच्या आरोग्यासाठी आमचे पुढचे मोठे पाऊल हे आजार टाळणे हेच असले पाहिजे. आपण धोके आधीच ओळखले पाहिजेत. निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच नियमित आरोग्य तपासणी ही प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनवली पाहिजे. कुटुंबांनी, शाळांनी, कंपन्यांनी आणि आरोग्य यंत्रणेने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे : हृदयाचे आरोग्य हे लक्षणे दिसण्याच्या खूप आधीपासूनच बिघडायला सुरुवात झालेली असते. एखाद्या गंभीर संकटाचा सामना करावा लागल्यावरच तरुण भारताला हृदयरोग समजणार का? आपण वेळेवर पावले उचलली, तर आजार झाल्यावर उपचार करण्याऐवजी तो आजार होण्यापासूनच रोखू शकतो. म्हणूनच प्रश्न हा नाही की तरुण भारतीयांना हृदयरोगाचा धोका आहे की नाही. प्रश्न हा आहे की, आपण या धोक्याला वेळेत ओळखून त्यावर उपाय करायला तयार आहोत का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आज प्रश्न हा नाही की तरुण भारतीयांना हृदयरोगाचा धोका आहे की नाही. तो तर उघडच आहे. पण खरी गोष्ट ही आहे की, आपण या धोक्याला वेळेवर ओळखण्यास तयार आहोत का? जेणेकरून त्यावर काहीतरी उपाय करता येईल.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *