पुस्तक परीक्षण:उपेक्षित इतिहास, संतसाहित्य अन् रसाळ समीक्षा; वाचा डॉ. पुष्पा लिमये यांच्या ‘विविधा’चे समृद्ध शब्दविश्व…!

डॅा. पुष्पा लिमये लिखित विविधा हा स्फुट लेखसंग्रह हाती पडला. या पुस्तकात चरित्रपर लेख, धार्मिक व अध्यात्मिक साहित्य, संत वाड्मय, इतिहासविषयक लेख अशा विविध विषयांवरील चिंतन आढळते. विषयांचे वैविध्य आणि लेखिकेचे नाव यांना एका सूत्रात गुंफणारी वेगवेगळ्या फुलांची परडी मुखपृष्ठावर आहे. उमेदीच्या काळात अनेक ठिकाणी नोकरी बदलत, शेवटी अध्यापिका आणि प्राचार्य असा लेखिकेचा जीवनप्रवास झाला आहे. त्यांचे अनुभवसंपन्न विचारविश्व त्यांच्या लेखणीतून उमटले आहे. पुस्तकातील लेख तीस-पस्तीस वर्षांपूर्वी लिहिले आहेत. लेखांच्या विषयात यादृच्छिकपणा असल्याने वाचकांशी सूर जुळण्यास सुरुवातीला थोडा वेळ लागतो. पुस्तकाला आनंद हर्डीकर यांचे अनुभवी संपादन लाभले, ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात विशेष प्रकाशझोतात न आलेल्या समाजसुधारक धुरिणांबद्दल लेखिका विशेष विस्ताराने आणि जिव्हाळ्याने लिहितात. ज्या अधिकाराने हा विषय मांडला गेला आहे, त्यावरून तो त्यांचा अभ्यासविषय असल्याचे लक्षात येते. वऱ्हाड प्रांताचे ‘न्यायमूर्ती रानडे’ म्हणवले गेलेले विष्णू मोरेश्वर महाजनी यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे इंग्रजी भाषांतर केले. हे कार्य आजवर अप्रकाशितच राहिले. अशा प्रकारे संत साहित्याचे इंग्रजी भाषांतर करण्याचा कदाचित हा पहिलाच प्रयोग असावा. उदाहरणादाखल काही अभंग आणि त्यांचे फर्मास इंग्रजी भाषांतर दिल्याने विष्णू मोरेश्वर महाजनी यांच्या कार्याच्या थोरवीचे प्रत्यंतर येते. महादेव मोरेश्वर कुंटे यांच्याबद्दल लेखिका विशेष आत्मीयतेने लिहितात. कुंट्यांचा धर्मविचार आणि तत्वज्ञान, तत्कालीन धर्माचे विकृत स्वरूप, त्यातील साचलेपण, नवे पंथ स्थापण्यातील निरर्थकपणा, काळाची पावले ओळखून औद्योगीकरणाची गरज, व्यावसायिक शिक्षणाची पायाभरणी (1885 सालात कुंट्यांनी स्वत: सूर्यशलाका नावाच्या शिसपेन्सीलींचा कारखाना काढला होता!), त्यांची राजकीय भाष्ये, जागतिक इतिहासाचा अभ्यास, पुढारलेली सामाजिक दृष्टी आणि व्यक्तिगत जीवनात त्याचे काटेकोर पालन (मुलीचे दोष न लपवता तिचे लग्न लावून देणे आणि कुष्ठरोगी मुलाला पत्नीचा रोष पत्करून अविवाहित ठेवणे, या गोष्टी एकोणिसाव्या शतकात क्रांतिकारक होत्याच. शिवाय कुंट्यांच्या उच्च नैतिक आचरणाचे दर्शन घडवणाऱ्या होत्या.), शैक्षणिक विचार यावरील विस्तारपूर्वक लेखांमधून कुंट्यांचे जीवितकार्य समाजापुढे आणण्याची लेखिकेची प्रामाणिक तळमळ दाद देण्याजोगी आहे. केशवसुतांपूर्वी दीडेक दशक कुंट्यांच्या काव्यविचारातील आधुनिकतेचे यथार्थ विवेचन करणारा लेखही वाचनीय आहे. एकोणिसाव्या शतकातील वाचनसंस्कृती व त्यात होत गेलेले बदल यावरही अभ्यासपूर्ण प्रकरणे आहेत. 1825 ते 1885 या काळात 152 नवीन मराठी मासिके निघाली, अशी माहिती मिळते. त्यातील 1825 ते 1840 या कालावधीत केवळ तीन मासिके होती! निबंधमाला, निबंधचंद्रिका, मनोरंजन, न्यायदीपिका, दीनमित्र, कुमारसंभव, दंभहारक, विविधज्ञान अशा नावांची मासिके आणि त्यांच्या मासलेवाईक वर्गणीदारांशी संबंधांवरचा लेख आजच्या काळाच्या प्रकाशात वाचताना गंमतशीर वाटतो. वऱ्हाड समाचार या वृत्तपत्राच्या वृत्तांतावरही दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. लेखिकेचे पीएचडीचे मार्गदर्शक, डॅा. सु. रा. चुनेकर, संतसाहित्याचे अभ्यासक व एस. पी. महाविद्यालयातील प्राध्यापक डॅा. व. दि. कुलकर्णी, नानासाहेब चापेकर या बिजवराशी विवाह झाल्यानंतर पन्नास वर्षे त्यांच्याशी नेटाने संसार करणाऱ्या रमाबाई चापेकर यांच्यावर व्यक्तिचित्रणपर लेख आहेत. हे सगळेच लेख विशेष उल्लेखनीय आहेत. चुनेकरांचे कृतज्ञ स्मरण, व. दि. कुलकर्णींशी जुळालेला स्नेहबंध लेखातून प्रकट होतो. नानासाहेब चापेकरांच्या जीवनचरित्रात सतत पहिल्या पत्नीचे उल्लेख येतात, परंतु रमाबाईंना कसलेही स्थान नाही, हे वाचताना मन भरून येते. रमाबाईंच्या वाट्याला आलेले अवहेलनेचे सोशिक जगणे, केवळ हळहळायला लावणारे आहे. ते लेखिका प्रत्ययकारी रितीने वाचकांपर्यंत पोहोचवतात. भा. रा. तांबे, ना. सी. फडके, कुसुमाग्रज, वसंत बापट यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांच्या निवडक साहित्य आणि काव्याचे रसग्रहण करणारे अभिरुचीपूर्ण लेख पुस्तकात आहेत. ‘भूमिकन्या बहिणाबाई चौधरी : एक चिंतन’ या पुस्तकासह 'गोची' (काव्यसंग्रह), 'शिवविजय' (छत्रपती शिवाजी महाराजांचे पद्य चरित्र), ‘मुहम्मद - क्रांतीचे प्रेषित’ या इतर काही पुस्तकांचे परिचय करून देणारे लेख आहेत. पुस्तकातील रिकाम्या जागांत लेखिकेने स्वतःच्या भावकविता, चारोळ्या पेरून कवयित्री असण्याचाही परिचय दिला आहे. त्यातून पुस्तकाच्या देखणेपणात भरच पडली आहे. गणेश योगींद्रांवरचे लेख व्यक्तिगत श्रद्धेतून लिहिले गेले आहेत. सर्वच वाचकांना ते पटतील असे नाही. सुरुवातीलाच हे लेख येत असल्याने या लेखांचा प्रभाव संपूर्ण पुस्तकावर रेंगाळताना जाणवतो. प्रस्तुत लेख अनेक वर्षांपूर्वी इतरत्र प्रकाशित झाले, ते पुस्तकरूपाने पुनर्प्रकाशित करताना काही ठिकाणी पुढचे-मागचे संदर्भ देणे आवश्यक ठरते. (उदाहरणार्थ पुण्याचे गणपती, या वेगळ्या पुस्तकासाठी लिहिलेला प्रस्तावनापर लेखात पात्रपरिचय अपेक्षित आहे.) पुढील आवृत्तीत काही किरकोळ मुद्रण दोष (उदा. विष्णू मोरेश्वर यांचा जन्म1951 साली झाल्याचा उल्लेख आहे; तो 1851 हवा.) दुरुस्त करता आल्यास नवख्या वाचकांचा गोंधळ कमी होईल. उपेक्षित किंवा फारशा चर्चिल्या न गेलेल्या वैविध्यपूर्ण विषयांवरचे संशोधनपर, संयत, कृतज्ञ व आस्वादक लिखाण हे या पुस्तकाचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. गतकाळात डोकावून पाहण्यासाठी लागणारा झरोका, म्हणून या पुस्तकाची नक्कीच उपयुक्तता आहे. पुस्तकाचे नाव - विविधा लेखक - पुष्पा लिमये प्रकाशक - पुष्पा मोरेश्वर लिमये संपादक - आनंद हर्डीकर मूल्य - ₹ 300/- पृष्ठसंख्या - 224 (लेखक कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.)

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *