राज्यात यंदा दीड लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

  मालेगाव : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. १९७ पैकी सात कारखाने बंद झाले आहेत. १० मार्चअखेर राज्यात एक हजार १९ लाख टन उसाचे गाळप झाले असून, यातून एक हजार ५१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. मुबलक ऊस असल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. उपलब्ध ऊस पाहता राज्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांचे उत्पादन एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहू शकेल. यंदा विक्रमी साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी राज्यात ९४ सहकारी व ९५ खासगी, असे एकूण १८९ कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला. या वर्षी ९८ सहकारी व ९९ खासगी, अशा एकूण १९७ कारखान्यांमधून साखरेचे उत्पादन घेतले जात आहे. राज्यात १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे उत्पादनावर काहीसा परिणाम झाला. कोरोना ओसरल्याने हंगाम जोरात सुरू आहे. कोल्हापूर विभागातील ३६ पैकी सात कारखाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात बंद झाले. उर्वरित १९० कारखान्यांमधून उत्पादन घेतले जात आहे. राज्यात हुप्परी (ता. हातकंणगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना साखर उत्पादनात अग्रेसर आहे. कारखान्याने आतापर्यंत १८ लाख २७ हजार १०० टन उसाचे गाळप केले असून, यातून २२ लाख एक हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखरउतारा १२.०५ आहे. कोल्हापूर विभागातील बहुतांशी साखर कारखान्यांचा साखरउतारा ११ ते १२ च्या दरम्यान आहे. राज्यातील अमरावती व नागपूर या विभागात एकही सहकारी साखर कारखाना सुरू नाही. अमरावतीत तीन, तर नागपूर विभागात चार, खासगी कारखाने सुरू आहेत. साखरउतारा घटला गेल्या वर्षी १० मार्चपर्यंत ८८४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यातून ९१६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले होते. साखर उतारा १०.३६ होता. या वर्षी उसाचे गाळप वाढून साखरेचे उत्पादनही वाढले. मात्र, साखरउतारा १०.३२ एवढाच राहिला आहे. राज्यात सलग तीन वर्षे झालेल्या समाधानकारक पावसामुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे गळीत हंगाम एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहील. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वत्र रसवंतींच्या घुंगरांचे आवाज ऐकू येत आहेत. परिणामी, ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. खानदेशसह अहमदनगर विभागात १७ सहकारी, दहा खासगी, असे एकूण २७ कारखाने सुरू आहेत. विभागात आतापर्यंत १४० लाख टन उसाचे गाळप झाले असून, १३७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. साखरउतारा केवळ ९.८४ एवढाच आहे.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply