कोल्हापूर: स्वतःच्या खिशातून खर्च, अडीच किमी जंगलवाट अन् ११ विद्यार्थ्यांसाठी अथक धडपड; शिक्षक पांडुरंग चव्हाणांचा प्रेरणादायी प्रवास

कोल्हापूर: भुदरगड तालुक्यातील एक अतिशय प्रेरणादायी आणि शिक्षकाचे कर्तव्ये चोखपणे बजावणारी बातमी समोर आली आहे. दुर्गम भागातील अवघ्या अकरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत एका शिक्षकाने शिक्षणाचा दीप तेवत ठेवला आहे. एरंडपे धनगरवाडा (ता. भुदरगड) येथील शाळेत जाण्यासाठी प्राथमिक शिक्षक पांडुरंग चव्हाण दररोज तब्बल अडीच किलोमीटरची कठीण जंगलवाट तुडवत आहेत. चिखल-गाळाचा सामना करत आणि अस्वल, बिबट्या, रानडुकरांसारख्या खतरनाक वन्यप्राण्यांचा मोठा धोका पत्करून ते विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अहोरात्र धडपडत आहेत.

या प्रवासाविषयी सविस्तर माहिती देताना, पांडुरंग चव्हाण यांना रोज बोरवडे येथून एरंडपे धनगरवाड्यापर्यंतचा मोठा प्रवास करावा लागतो. गावामध्ये वाहन उभे करून तिथून पुढे त्यांना अडीच किलोमीटरची बिकट जंगलवाट पायी पार करावी लागते. पावसाळ्यात या वाटेवर प्रचंड चिखल, गाळ आणि घसरड्या रस्त्याचा सामना करावा लागतो. या संपूर्ण परिसरात वन्यप्राण्यांचा सतत वावर असल्याने हा प्रवास अत्यंत जीवघेणा आणि धोकादायक बनतो. मात्र, विद्यार्थ्यांच्या भविष्यासमोर आणि शिक्षणासमोर या सर्व अडचणी त्यांना अत्यंत क्षुल्लक वाटतात.

विशेष म्हणजे, शाळेतील पटसंख्या अवघी अकराच असली, तरी प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा आहे, या उच्च भावनेतून शिक्षक पांडुरंग चव्हाण यांनी केवळ अध्यापनच नाही, तर शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी आपल्या स्वतःच्या खिशातून आर्थिक पदरमोड केली आहे. शाळेला एक नवा चेहरा मिळवून देण्यासाठी ते सतत झटत असतात. दुर्गम आणि डोंगराळ भागात शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणार्‍या पांडुरंग चव्हाण यांच्या या निष्ठावान आणि प्रेरणादायी कार्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *