पुणे: शालेय विद्यार्थिनींचा ८ दिवस पाठलाग करून विनयभंग; दोन नराधम अटकेत

पुणे: केडगाव ८ दिवस शाळेतून घरी परतणाऱ्या १२ वर्षीय दोन अल्पवयीन बहिणींचा पाठलाग करून त्यांची छेडछाड केल्याची खळबळजनक घटना दौंड तालुक्यातील पारगाव चौकात घडली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करत दोन्ही आरोपींना गजाआड केले आहे. प्रविण गणपत थोरात आणि दिनेश दत्तात्रय पासलकर (दोन्ही रा. खुटबाव, ता. दौंड, जि. पणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बहिणी शाळेतून घरी येत असताना, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील इको गाडीचा (क्र. MH 42 BS 8535) वापर करून त्यांचा पाठलाग केला. २० जुलै आणि २७ जुलै रोजी पारगाव हद्दीतील पारगाव चौकात आरोपींनी गाडी मुलींच्या समोर आडवी लावली. यादरम्यान आरोपी क्र. १ प्रविण थोरात याने गाडीतून खाली उतरून अयोग्य वक्तव्य करत पीडितेचा डावा हात पकडून तिला स्वतःकडे ओढले. तर आरोपी क्र. २ दिनेश पासलकर याने पीडितेच्या बहिणीचा हात धरून तिला अंगावर ओढून घेत लज्जास्पद कृत्य केले. सदर दोन्हीही आरोपी या बहिणींना गेले आठ दिवस त्रास देत होते. शेवटी वैतागून त्यांनी पोलीस ठाणे गाठले.

या प्रकरणाबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून २८ जुलै रोजी रात्री ९ वाजता यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. २९ जुलै रोजी दोन्ही आरोपींना अटक केली. सदर गुन्हा सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा गोसावी यांनी दाखल करून घेतला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करत आहेत.


Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.



गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *