Pune : पोलिसांच्या मदतीला AI! अवघ्या काही मिनिटांत FIR नोंद, पुणे पोलिसांचा ‘स्मार्ट’ प्रयोग काय?

 

Pune : सध्या सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी नागरिकांच्या सेवेसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तक्रार नोंदणी, म्हणजेच FIR प्रक्रिया आता अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. याबाबत पुण्याचे डीसीपी चिलूमुला रजनीकांत यांनी माहिती दिली.

पुणे पोलिसांकडून FIR नोंदणीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पारंपरिक पद्धतीत FIR नोंदवण्यासाठी अनेक तास लागतात. मात्र AI-आधारित प्रणालीमुळे हा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. यासाठी बाणेर पोलीस ठाण्यात AI-आधारित FIR नोंदणी प्रणालीचा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

डीसीपी रजनीकांत यांनी सांगितले की, सध्याच्या पद्धतीत FIR नोंदवताना पोलीस आणि नागरिक दोघांचाही बराच वेळ खर्ची पडतो. ही प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी करण्यासाठी एंड-टू-एंड डिजिटायझेशनवर भर देत AI प्रणाली विकसित केली जात आहे.

या नव्या प्रणालीमुळे FIR नोंदणीसाठी लागणारा वेळ 3 ते 4 तासांवरून थेट 20 ते 30 मिनिटांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तक्रारीचा मजकूर आपोआप ओळखला जाईल, त्यानुसार संबंधित कायदेशीर कलमे सुचवली जातील आणि FIR चा मसुदा तयार केला जाईल. त्यानंतर पोलीस अधिकारी त्याची पडताळणी करून अंतिम FIR नोंदवतील.

यामध्ये व्हॉइस-टू-टेक्स्ट सुविधाही उपलब्ध असून, नागरिकांना तक्रार सांगणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे फॉर्म भरण्याची आणि अनेक प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल.

सध्या हा पायलट प्रकल्प बाणेर पोलीस ठाण्यात यशस्वीपणे राबवला जात असून, भविष्यात तो संपूर्ण शहरात विस्तारण्याचा विचार पुणे पोलिसांकडून करण्यात येत आहे.



गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *