Pune: हवामानाचा मोठा ट्विस्ट! पुण्यात 100 मिनिटांत 100 मिमी पाऊस; झाडं कोसळली, अनेक ठिकाणी पाणी शिरलं; 145 तक्रारी दाखल

Pune : शहरात दुपारी 3.30 ते सायंकाळी 5 या दरम्यान झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अवघ्या दीड ते दोन तासांत शहरातील विविध भागांत विक्रमी पावसाची नोंद झाली. खडकवासला परिसरात सर्वाधिक 104.2 मिमी पाऊस झाला. त्यानंतर सिंहगड रोड (100.2 मिमी), कोंढवा-येवलेवाडी (92.2 मिमी), बिबवेवाडी (81.4 मिमी) आणि कोथरूड-वावधन (66.6 मिमी) येथेही जोरदार सरी कोसळल्या.

145 तक्रारींची नोंद
या अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले, नाले व चेंबर तुंबले, तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे अशा प्रकारच्या सुमारे 145 तक्रारी प्राप्त झाल्या. याशिवाय शहरात 21 ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनांची नोंद करण्यात आली.

वाहतूक कोंडीचा फटका
खडकवासला, सिंहगड रोड, कोंढवा, बिबवेवाडी, विश्रामबाग वाडा, फर्ग्युसन कॉलेज रोड, स्वारगेट, कोरेगाव पार्क, पुणे विद्यापीठ, हडपसर, उंड्री आणि वारजे या भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

झाड कोसळून महिलेचा मृत्यू
दरम्यान, सिंहगड रोड परिसरात झाड कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्काळ हालचाली करत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सतर्क केले आणि मदतकार्य सुरू केले. JCB, डंपर, युटिलिटी व्हॅन तसेच पंपिंग मशीनच्या मदतीने साचलेले पाणी काढण्याचे काम करण्यात आले. अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते.

नुकसानग्रस्तांना मदतीचे निर्देश
महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी शिरलेल्या घरांचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी महापालिकेच्या 24x7 हेल्पलाईन क्रमांक (020-25501269 / 020-25506800) वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *