पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!

पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आलेला तरुण शाळकरी भाच्यासह घराजवळील शेततळ्यात पोहण्यासाठी गेला. मात्र, पोहत असताना पाण्यात बुडून दोघाही मामा-भाच्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही अत्यंत हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास मोशी येथील बनकर वस्ती येथे घडली. सिद्धांत उत्तम लगाडे (वय २१, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) आणि रितेश रमेश ताकपेरे (वय १२, रा. बनकर वस्ती, मोशी) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेमुळे लगाडे आणि ताकपेरे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

घटनेचा तपशील व पोलिसांची माहिती

एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत याची बहीण स्नेहा ताकपेरे मोशीतील बनकर वस्ती येथे राहण्यास आहे. सिद्धांत आणि त्याचे वडील उत्तम चार दिवसांपूर्वी बहीण स्नेहा यांना भेटण्यासाठी मोशी येथे आले होते. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास सिद्धांत आणि स्नेहा यांचा मुलगा (सिद्धांतचा भाचा) रितेश हे दोघे घराजवळ असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले.

शेततळ्यात पोहत असताना अचानक दोघेही खोल पाण्यात बुडाले. याबाबतची माहिती कुटुंबीयांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी तपासणी करून दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

वडील काम करत असलेल्या रुग्णालयातच नेण्यात आले

मृत्यूमुखी पडलेल्या रितेशचे वडील रमेश ताकपेरे हे मोशीतील एका खासगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करतात. शेततळ्यातून बाहेर काढल्यानंतर सिद्धांत आणि रितेश या मामा-भाच्यांना याच खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते, मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही.

बुधवारी रात्री आठच्या सुमारास या दुर्घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कार्यवाही सुरू केली. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *