पुणे: परीक्षेनंतर बसथांब्यावर थांबलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; बोपदेव घाटाजवळ भरधाव ट्रक धडकून तिघा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा करुण अंत!

पुणे: भरधाव वेगातील टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोने बसथांब्यावरील विद्यार्थ्यांना चिरडल्याची भीषण दुर्घटना बुधवारी (२५ नोव्हेंबर २०२६) दुपारी पुण्यातील येवलेवाडी-बोपदेव घाट रस्त्यावर घडली. या प्राणांतिक अपघातात तीन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर आणि विशेषतः येवलेवाडी व कोंढवा परिसरात हळहळ व शोककळा पसरली आहे.

तिघा विद्यार्थ्यांचा करुण अंत

या भीषण अपघातात विशाल दांगडे (कोल्हेवाडी, नांदेड सिटी), मोहिनी चौधरी (रा. हडपसर) आणि सिद्धेश राजे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर श्वेता तळेकर आणि सोहम घंगाळे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेला टेम्पोचालक प्रतीक मारुती चव्हाण (वय २२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया राबवण्यात आली.

परीक्षेनंतर घरी जाण्यासाठी निघाले होते विद्यार्थी

अपघातात जीव गमावलेले विद्यार्थी ट्रिनिटी कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. त्यांची विद्यापीठाची परीक्षा सुरू असून, पेपर दिल्यानंतर ते घरी जाण्यासाठी बसथांब्यावर आले होते. अपघातानंतर बसथांब्यावरील इतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराट आणि धावपळ निर्माण झाली. दररोज महाविद्यालय सुटल्यानंतर अनेक विद्यार्थी या थांब्यावर बसची वाट पाहतात. येथून शेकडो वाहने ये-जा करतात; मात्र हा टेम्पो अचानक अनियंत्रित होऊन काळ बनून येईल, याची पुसटशीही कल्पना त्या विद्यार्थ्यांना नव्हती, अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

उतारावर नियंत्रण सुटून घडली दुर्घटना

घटनेची माहिती मिळताच कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदरकडून पुण्याकडे येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे उतारावर नियंत्रण सुटले. त्यानंतर हा ट्रक पुढे जाणाऱ्या एसयूव्हीला मागून धडकला आणि थेट ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगजवळील बसथांब्याच्या दिशेने वळला.

परीक्षांच्या वेळापत्रकामुळे बसथांब्यावर एकाच वेळी गर्दी

महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की, बहुतेक शाखांच्या अंतर्गत परीक्षा सुरू असल्याने बसथांब्यावर नेहमीपेक्षा जास्त गर्दी झाली होती आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडले होते. के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक-अध्यक्ष कल्याण जाधव यांनी सांगितले की, नियमित वर्गांच्या वेळी वेगवेगळ्या सत्रांमुळे विद्यार्थी वेगवेगळ्या वेळी घरी जातात; मात्र परीक्षांच्या वेळापत्रकामुळे अनेक विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडले. सासवडकडून पुण्याकडे जाणाऱ्या बसेस या घाटाजवळील मार्गावरून जातात आणि या रस्त्यावर अनेक वाहने अतिवेगाने धावतात, ज्यामुळे बसथांब्याचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *