सांगली: ५९२ कोटींच्या प्रकल्पाला भाजप-राष्ट्रवादीकडून खो; महापौरांचे आरोप चुकीचे असल्याचा शिंदेसेनेचा गंभीर दावा!

सांगली: शहरामधील पूर नियंत्रणाशी संबंधित तब्बल ५९२ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरून सांगलीच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. सांगلي व मिरज शहरांमधील पुराच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा व्हावा यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने ५९२ कोटी रुपयांचा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या कामात जाणीवपूर्वक खो घातला जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसह (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन वनखंडे आणि महापालिकेतील शिंदेसेनेचे गटनेते युवराज बावडेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केलेल्या आरोपांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला.

महापौरांचे आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे: मोहन वनखंडे

पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाप्रमुख मोहन वनखंडे म्हणाले की, सांगली व मिरज शहरातील नागरिकांना पुराच्या संकटापासून मुक्त करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने ५९२ कोटींचा हा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुढील दोन वर्षांमध्ये या प्रकल्पाचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे नियोजन असून, यामुळे भविष्यात सांगलीकरांना पुराचा सामना करावा लागणार नाही. हा महत्त्वपूर्ण प्रकल्प वेळेत आणि सुरळीत मार्गी लागावा, यासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्नशील आहे.

शिवसेनेचे नेते, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष तसेच 'मित्रा' (MITRA) संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी या संदर्भात दोन ते तीन उच्चस्तरीय बैठका घेतल्या आहेत. मात्र, महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर जी टीका केली आहे, ती पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. 'मित्रा' कंपनीच्या समन्वयाने हा संपूर्ण प्रकल्प राबविला जात असून, आमदार राजेश क्षीरसागर हे त्या कंपनीचे उपाध्यक्ष आणि नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची त्यांची शासकीय जबाबदारी आहे, म्हणून त्यांनी यात लक्ष घातले आहे. परंतु, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनाकारण या प्रकल्पाला खो घालण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप वनखंडे यांनी केला.

स्थायी समितीचा गदारोळ चुकीचा: युवराज बावडेकर

यावेळी बोलताना महापालिकेतील शिंदेसेनेचे गटनेते युवराज बावडेकर म्हणाले की, पुराच्या पाण्यामुळे दरवर्षी सांगलीत मोठी रोगराई पसरते व नुकसान होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत आहे. या प्रकल्पात महापालिकेची थेट जबाबदारी मर्यादित असून शासन स्तरावर सर्व कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया राबविल्या जात आहेत. या कामाची वर्क ऑर्डर आधीच दिली गेली असताना, केवळ सीलच्या विषयावरून स्थायी समितीने अनावश्यक गदारोळ करणे अत्यंत चुकीचे आहे. या प्रकरणात काँग्रेसनेही काही ठिकाणी घेतलेले समर्थन चुकीचे असून, एकूणच भाजप आणि काँग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीका त्यांनी केली. आमदार राजेश क्षीरसागर यांचा या प्रकल्पाशी काय संबंध, असा सवाल भाजपकडून उपस्थित केला जात आहे, मात्र त्यांना या विषयात का लक्ष घालावे लागले, याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *