कोल्हापूर: गडहिंग्लजमध्ये 'दुष्काळ' आंदोलन पेटले! महसूलमंत्र्यांच्या फोननंतर वाढला उद्रेक, रस्त्यावर टायरी पेटवून ठिय्या; वाहतूक ठप्प

कोल्हापूर: आपल्याला तालुक्यातील रँडम २० गावातील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. उर्वरित सर्व गावांचा सर्व्हे करून पुढील कॅबिनेट मिटींगमध्ये दुष्काळी तालुक्यात गडहिंग्लजचाही समावेश करीत आहोत, त्यामुळे आंदोलन स्थगित करावे', असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भ्रमणध्वनीवरून केले. मात्र, सनदशीर मार्गाने सुरू असलेले आंदोलन बेदखल केल्याची भावना निर्माण झाल्याने आंदोलक संतप्त झाले. त्यांनी संकेश्वर-बांदा महामार्गावर टायर पेटवले, रस्त्यावर आडवे झोपून वाहने रोखली. त्यामुळे पोलिसांनी १९ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून दिले.


दुष्काळी तालुक्यात गडहिंग्लजचा समावेश व्हावा यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील दसरा चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी (दि. १७) आंदोलनाचा विसावा दिवस होता. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आंदोलकांना होती. मात्र, महसूलमंत्र्यांकडूनच कॅबिनेटच्या पुढील बैठकीचा वायदा आल्यामुळे कार्यकर्ते शेतकरी संतप्त झाले.

मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर खराब टायरवर पेट्रोल टाकून पेटवून दिले. घटनास्थळी धावलेल्या पोलिसांनी पेटलेले टायर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे झोपून वाहने रोखल्याने संकेश्वर, चंदगड व आजरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे पोलिसांनी प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना वाहनातून पोलिस ठाण्यात नेत असताना पोलिस गाड्यादेखील अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. यावेळी सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन देसाई, सचिन शेडगे, अंकुश रणदिवे यांच्यासह विविध पक्ष-संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ठळक घडामोडी
दुपारी दीडच्या सुमारास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून मंत्री बावनकुळे यांनी शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख अमर चव्हाण यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याकडून मंत्र्यांचा निरोप समजताच आंदोलनाच्या मांडवातील संतप्त कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले.


अमर चव्हाण यांच्यासह 'मनसे'चे नागेश चौगुले, राष्ट्रवादीचे गुंड्या पाटील, जनता दलाचे बाळेश नाईक, उद्धवसेनेचे सुनील शिंत्रे, भाजपाचे मल्लिकार्जुन आरबोळे, प्रभात साबळे, अवधूत पाटील, तानाजी कुराडे आदींनी रस्त्यावर झोपून वाहने अडवली.


पोलिस निरीक्षक सतीश होडगर व सहकाऱ्यांनी पाणी ओतून पेटत्या टायरी विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, कार्यकर्ते त्या टायर अन्यत्र नेऊन पेटवत होते. थांबलेली वाहने हलवण्याचा प्रयत्न करताच ती वाहने फोडण्याबरोबरच स्वतः पेटवून घेण्याचा इशारा कार्यकर्ते देत होते.
डीवायएसपी विवेक पाटील यांनी चंदगड, आजरा व नेसरी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राखीव पोलिस दलाची कुमक मागवली.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *