विलीनीकरणाला पूर्णविराम; आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ काय?"; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाच्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांचे रोखठोक भाष्य!

राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही फुटीर गटांच्या एकत्रिकरणाबाबत (NCP Merger) आणि विलिनीकरणाबाबत विविध तर्क-वितर्क व चर्चांना उधाण आले होते. या सर्व चर्चांवर आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या तथा लोकसभा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा विषय आपल्यापुरता आणि आपल्या पक्षापुरता पूर्णपणे संपला आहे. आता त्यावर पुन्हा चर्चा करण्यात किंवा तर्क-वितर्क लढवण्यात कोणताच अर्थ उरलेला नाही." या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणाच्या चर्चांना आता अधिकृतपणे पूर्णविराम मिळाला आहे.

अजित पवार गटाकडून कोणताही संपर्क नाही:

विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी पुढे स्पष्ट केले की, विलीनीकरणाबाबत अजित पवार गटाकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून आपल्याशी किंवा आमच्या पक्षाशी कोणताही अधिकृत संपर्क साधण्यात आलेला नाही. तसेच, शरदचंद्र पवार यांचा गट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होणार असल्याच्या ज्या काही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत, त्या सर्व अफवा असल्याचे सांगत त्यांनी त्या पूर्णपणे फेटाळून लावले. संसदेच्या किंवा संसदीय समितीच्या कामकाजादरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत केवळ औपचारिक भेटी झाल्या होत्या, त्यामुळे याचा राजकीय अर्थ काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक व देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण:

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून राज्याच्या राजकीय पटलावर जोरदार चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आले होते.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या बैठकीत विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. या संदर्भातील सर्व चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू असून त्यातून केवळ राजकीय पतंगबाजी केली जात आहे. फडणवीस म्हणाले, "अद्याप तरी आमच्याशी विलिनीकरणाबाबत कोणीही अधिकृत चर्चा केलेली नाही. अशी कोणतीही चर्चा सुरू असती, तर संबंधितांनी आम्हाला किमान त्याची कल्पना दिली असती. प्रत्यक्षात अशा प्रकारे कोणीही काहीही बोललेले नाही, त्यामुळे या विषयावर अनावश्यक चर्चा करणे योग्य ठरणार नाही."

छगन भुजबळ यांचे वक्तव्य आणि राजकीय समीकरणे:

दुसरीकडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, जर शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होऊन सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आम्हाला नक्कीच आनंद होईल. तसेच विलीनीकरणासंदर्भात जोपर्यंत सुनेत्रा पवार निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत अशा चर्चांना काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले होते. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या ताज्या भूमिकेमुळे सर्व अटकळांना आता पूर्णविराम मिळाला असून, आगामी काळात दोन्ही गट स्वतंत्रपणेच राजकीय वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *