पुणे: पुण्यातील लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांचा चमत्कार; गंभीर हृदयविकार असलेल्या नवजात बालकाला ४० तास जीवनरक्षक प्रणालीवर ठेवून दिले यशस्वी जीवदान!

पुणे: सीमेवर देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र तैनात असलेल्या एका जवानाच्या नवजात बालकाला पुण्यातील लष्करी रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी आपल्या अतुलनीय कौशल्याच्या जोरावर पुनरुज्जीवन दिले आहे. पुण्यातील नामांकित 'आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅकिक सायन्सेस' (AICTS) येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि गंभीर हृदयविकाराने ग्रासलेल्या नवजात बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला सुरक्षित जीवनदान दिले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे बालकाच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून वैद्यकीय वर्तुळातून लष्करी डॉक्टरांच्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जन्मतःच प्रकृती होती अतिशय अस्थिर

संरक्षण विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सीमेवर देशसेवा बजावत असलेल्या एका जवानाच्या बालकाचा जन्म पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये झाला होता. मात्र, जन्माला आल्यानंतर काही वेळातच या नवजात बालकाची प्रकृती अत्यंत खालावली आणि ती पूर्णपणे अस्थिर झाली. तपासणी केल्यानंतर बालकाला जन्मजात अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीचा हृदयविकार असल्याचे निष्पन्न झाले.

परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन, बालकाला तात्काळ स्थिर करण्यासाठी आणि पुढील उपचारासाठी बाल हृदयरोगतज्ज्ञांच्या विशेष पथकाने पुढाकार घेतला. सुरुवातीला बालकाच्या हृदयातील कॅथेटरद्वारे आवश्यक वैद्यकीय उपचार व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, ज्यामुळे त्याच्या शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यास मदत झाली.

४० तास ईसीएमओ (ECMO) जीवनरक्षक प्रणालीवर ठेवले

हृदयाची शस्त्रक्रिया आणि त्यानंतरही बालकाची प्रकृती अत्यंत गंभीर व नाजूक असल्यामुळे, डॉक्टरांच्या पथकाने कोणतीही जोखीम न घेता बालकाला अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणालीवर (ईसीएमओ - ECMO) ठेवण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत डॉक्टरांच्या विशेष पथकाने अत्यंत सतर्क राहून बालकाच्या हृदय व श्वसनसंस्थेच्या कार्यावर अहोरात्र बारकाईने लक्ष ठेवले.

अथक प्रयत्नांनंतर तब्बल ४० तासांच्या तीव्र उपचारांनंतर बालकाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. त्यानंतर बालकाला 'ईसीएमओ' जीवनरक्षक प्रणालीतून यशस्वीपणे बाहेर काढण्यात आले. लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांचे हे यश आणि अफाट मेहनत केवळ त्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण सशस्त्र दलांच्या वैद्यकीय इतिहासात एक अभिमानास्पद कामगिरी ठरणारी आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *