Pune Crime : पुण्यातील ‘द रुट्स स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; महिला कर्मचारी व व्यवस्थापकाने इमारतीवरून उडी मारली, महिलेचा मृत्यू

Pune : विमानगर परिसरातील ‘द रुट्स स्पा’ येथे पोलिसांची कारवाई सुरू असताना महिला कर्मचारी आणि स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यात महिलेचा मृत्यू झाला असून, व्यवस्थापक गंभीर जखमी झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, विमानतळ पोलिस ठाण्याच्या पथकाने रविवारी दुपारी तीनच्या सुमारास स्पा सेंटरवर छापा टाकला. कारवाईदरम्यान अटकेच्या भीतीने महिला आणि व्यवस्थापकाने खिडकीतून उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले. उडी मारल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला आणि व्यवस्थापकाला पायाला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

संबंधित व्यक्तींची चौकशी
पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला. स्पा सेंटरचा कारभार, परवाने, कर्मचारी नोंदी; तसेच अन्य बाबींची तपासणी सुरू केली आहे. स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या प्रकारांबाबत तक्रारी मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली होती. घटनेतील मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनेबाबत स्पा सेंटरचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि अन्य संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे.

अपघाती मृत्यू म्हणून नोंद
संबंधित ‘स्पा’मध्ये देहविक्रीचा बेकायदा व्यवसाय केला जात होता. या प्रकरणी व्यवस्थापक व मालकाविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली जात आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *