पुणे: पुण्यात विवाहितेची आत्महत्या; घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांकडून महर्षीनगर येथील 'झांबरे पॅलेस'ची तोडफोड, परिसरात तणाव

पुणे: पुण्यातील मुकुंद नगर परिसरात २९ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पायल पवार झांबरे असे मृत महिलेचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर पायल यांच्या नातेवाईकांनी पुण्यातील महर्षी नगर परिसरात असलेल्या झांबरे पॅलेस येथे जाऊन तोडफोड केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पायल पवार झांबरे यांनी मुकुंद नगर येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. पायल यांचा विवाह पुण्यातील नामांकित झांबरे पॅलेसच्या मालकांच्या कुटुंबात झाला होता, अशी माहिती आहे. आत्महत्येच्या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी झांबरे पॅलेस येथे धाव घेतली.

पायल यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर सोमवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास १५ ते २० जणांनी झांबरे पॅलेस येथे येऊन तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे महर्षी नगर परिसरात खळबळ उडाली. झांबरे पॅलेस हे पुण्याच्या मध्यवर्ती भागातील मंगल कार्यालय असून, येथे लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रम आयोजित केले जातात. या ठिकाणी झालेल्या तोडफोडीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी झांबरे पॅलेस परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण काय, कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी काय होती आणि तोडफोडीच्या घटनेत कोणाचा सहभाग होता याचा तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *