बुलढाणा: शेतकऱ्यांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार संजय गायकवाड बॅकफूटवर; पक्षाच्या दबावानंतर व्यक्त केली दिलगिरी

बुलढाणा: शेतकऱ्यांविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे शिवसेना (शिंदे गट) चे आक्रमक आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षनेतृत्वाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. या तीव्र राजकीय दबावानंतर आणि राज्यभरातून उमटलेल्या संतापानंतर अखेर आमदार संजय गायकवाड यांनी यू-टर्न घेत जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकाराची अतिशय गंभीर दखल घेतली असून, शेतकऱ्यांविषयीची अशी मुक्ताफळे अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत, अशा कडक शब्दांत गायकवाड यांना तंबी दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. पक्षपातळीवर त्यांच्यावर निलंबनाची कारवाईसुद्धा होऊ शकते, असे संकेत मिळताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वतःची बाजू मांडण्याचा आणि दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.

सफाई देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, "मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातील आहे आणि माझे वडीलही शेतीच करायचे. त्यामुळे मी बळीराजाबद्दल कधीही अपशब्द वापरू शकत नाही. माझे ते विधान अमली पदार्थांचे सेवन करून, व्यसनाच्या आहारी जाऊन संसार उद्ध्वस्त करणाऱ्या आणि आत्महत्या करणाऱ्या प्रवृत्तींविषयी होते. मात्र, केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. तरीही माझ्या बोलण्याने जर शेतकरी बांधवांच्या किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो."

दरम्यान, गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुती सरकारची राजकीय कोंडी झाली होती. पक्षातून निलंबनाची कारवाई होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी थेट विचारला असता गायकवाड यांनी सावध पवित्रा घेत "नो कॉमेंट्स" असे म्हणत उत्तर देणे टाळले. तसेच विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना, युतीत कोणतीही धुसफूस नसून मोठ्या युतीमध्ये अशा छोट्या-मोठ्या गोष्टी घडत असतात, अशी सारवासारव त्यांनी केली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *