सात दशकानंतरही राधानगरी धरणाची मुख्य भिंत भक्कम; घनता चाचणी अहवाल समोर, भविष्यासाठी ग्राऊंटिंग उपाययोजनांचे नियोजन

सात दशकांहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही कोल्हापूर जिल्ह्याचे आपत्कालीन आणि जीवनदायी ठरलेले राधानगरी धरण आजही पूर्णपणे भक्कम आणि सुरक्षित असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. धरणाच्या मुख्य भिंतीची घनता चाचणी (Density Test) करण्यात आली असून, जुजबी गळतीचा अपवाद वगळता धरणाची मुख्य भिंत तांत्रिकदृष्ट्या अतिशय मजबूत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

पुण्यातील केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन संस्थेने (CWPRS) गतवर्षी १६ ते २० जून या कालावधीत 'न्यूक्लिअर बोर लाँगिंग' (Nuclear Bore Logging) तंत्रज्ञानाचा वापर करून राधानगरी धरणाच्या मुख्य भिंतीची घनता चाचणी केली होती. या अत्यंत कसोट, शास्त्रीय आणि सखोल चाचणीचा अहवाल नुकताच जलसंपदा विभागाला प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार, तपासणी करण्यात आलेल्या एकूण दहा ठिकाणांपैकी केवळ तीनच ठिकाणी घनतेमध्ये किंचित घट असल्याचे निदर्शनास आले आहे, तर उर्वरित भागात भिंत अत्यंत मजबूत स्थितीत असल्याचे आढळले आहे.

इतिहास पाहता, या धरणात १९५४ पासून नियमित पाणीसाठा केला जात असून, यापूर्वी १९७० मध्ये मोठे ग्राऊंटिंग (Grouting) करण्यात आले होते. त्यानंतर आता इतक्या वर्षांनी करण्यात आलेल्या या आधुनिक चाचणीमुळे धरणाच्या सुरक्षिततेबद्दलचे सर्व संभ्रम दूर झाले आहेत. पाण्याच्या दाबामुळे किंवा जुन्या बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा अंदाज घेण्यासाठी हा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे की, ज्या तीन ठिकाणी घनतेमध्ये किरकोळ घट आढळली आहे, त्या ठिकाणी भविष्यात कोणतीही जोखीम पत्करावी लागू नये यासाठी तातडीने विशेष 'ग्राऊंटिंग' व दुरुस्तीच्या उपाययोजना राबवण्याचे नियोजन केले जात आहे. या अहवालामुळे कोल्हापूर जिल्ह्यावरील पुराचा किंवा धरण सुरक्षेचा मोठा ताण हलका झाला असून बळीराजासह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

#RadhanagariDam #KolhapurNews #DamSafety #DensityTestReport #WaterResources #StructuralAudit #MaharashtraNews #CWPRS #DamGrouting #Radhanagari #SakalNews #MarathiNews #Kolhapur #DamMaintenance #EngineeringSafety



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *