मुंबई: मनोरी क्षारनिरास प्रकल्पाविरोधातील मच्छिमारांचा मोर्चा पोलिसांनी रोखला: बसेस अडवून चालकांना घेतले ताब्यात, चाव्याही केल्या जप्त!

मुंबई: बहुचर्चित मनोरी क्षारनिरास (विलवणीकरण) प्रकल्पाविरोधात लोकशाही मार्गाने वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यासाठी निघालेल्या मच्छिमारांच्या आंदोलनाला पोलिसांनी सुरुवातीलाच मोठा विरोध करत त्यांचे बसेस रोखल्याची घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी पूर्वनियोजित आंदोलनासाठी निघालेल्या मच्छिमारांच्या बसेस पोलिसांनी ठिकठिकाणी अडवल्या, एवढेच नव्हे तर बसचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या गाड्यांच्या चाव्या देखील जप्त केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल आणि महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना या संपूर्ण प्रकाराची सविस्तर माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या मनोरी भागातील ६ बसेस, गोराई येथील ५ बसेस, भाटी येथील ३ बसेस आणि पाली-उत्तन मच्छिमार सोसायटीच्या ३ बसेस अशा एकूण अनेक बसेस पोलिसांनी वाटेतच अडवून ठेवल्या. प्रशासनाची ही कारवाई अत्यंत निषेधार्ह असून यामुळे कोळी समाजाचा आणि मच्छिमारांचा आवाज जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे.

संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला असताना प्रशासनाकडून अशा प्रकारे बळाचा वापर करणे संविधानात्मक अधिकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. आपल्या समुद्राचे रक्षण करणे, पारंपारिक मासेमारी व्यवसाय टिकवून ठेवणे आणि आपल्या अस्तित्वासाठी लढा देणाऱ्या मच्छिमार बांधवांना रस्त्यावर उतरण्यापासून रोखण्याऐवजी प्रशासनाने त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर तोडगा काढणे गरजेचे होते, असे मत नेत्यांनी व्यक्त केले.

पोलिसांनी अडवलेल्या आंदोलकांच्या सर्व बसेस तातडीने सोडाव्यात, विनाकारण ताब्यात घेतलेल्या चालकांची तात्काळ सुटका करावी आणि या दडपशाहीच्या कारवाईचा कायदेशीर आधार स्पष्ट करावा, अशी आमची अत्यंत ठाम मागणी असल्याचे देवेंद्र तांडेल व किरण कोळी यांनी स्पष्ट केले. आमचा न्याय्य हक्काचा आवाज अशा पद्धतीने दाबला जाणार नाही आणि आमचा लढा असाच सुरू राहील. मनोरी क्षारनिरास प्रकल्प तात्काळ रद्द करावा आणि मच्छिमारांच्या लोकशाही अधिकारांचा व भावनाओंचा योग्य सन्मान राखला जावा, अशी आक्रमक भूमिका मच्छिमार बांधवांनी घेतली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *