भिवंडी महापालिकेत मोठा राजकीय भूकंप! भाजप समर्थकाला मदत करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या ६ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

मुंबई/भिवंडी: भिवंडी-निझामपूर शहर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक (Co-opted Corporators) निवडीच्या प्रक्रियेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. स्वीकृत सदस्यांच्या निवडीवेळी पक्षाचा अधिकृत व्हीप (पक्षादेश) धुडकावून लावत भाजप आमदार महेश चौघुले यांचे खंदे समर्थक असणाऱ्या भरत जंगलानी यांच्या नावाची शिफारस करून त्यांना पाठिंबा दिल्याने, समाजवादी पक्षाने (SP) आपल्या सहा नगरसेवकांवर कडक शिस्तभंगाची कारवाई केली असून त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

भिवंडी महापालिकेच्या विशेष महासभेत महापौर नारायण चौधरी यांनी ९ स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यामध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (शिंदे गट), कोणार्क विकास आघाडी आणि समाजवादी पक्षाच्या कोट्यातून सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, समाजवादी पक्षाच्या वाट्याला आलेल्या एका स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षाने ठरवलेला उमेदवार डावलून, पक्षाचे गटनेते आरिफ (आरिब) याकूब शेख आणि इतर ५ नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून भाजप आमदाराचे निकटवर्तीय भरत जंगलानी यांच्या नावाची शिफारस महासभेत केली आणि त्यांची निवड निश्चित केली.

पक्षाशी गद्दारी करून भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष रियाज आझमी यांनी या सहाही नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केल्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला.

हकालपट्टी करण्यात आलेल्या ६ नगरसेवकांची नावे: १. आरिफ (आरिब) याकूब शेख (गटनेते) २. काशफी शाफ मोमिन ३. आजीब जमाल मोमिन ४. अन्सारी शबाना शमीम ५. शेख सलमाबानो मोहम्मद अक्रम ६. खान अमान उबैद

पक्षाची भूमिका आणि कायदेशीर लढाईचा इशारा: या घटनेवर अत्यंत तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रियाज आझमी यांनी सांगितले की, "पक्षाच्या चिन्हावर आणि बळावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पक्षासोबत उघडपणे गद्दारी केली आहे. भाजपच्या समर्थकाला मदत करण्यासाठी पक्षाचा आदेश धुडकावणे ही अत्यंत गंभीर बाब असून असा प्रकार पक्ष कधीही सहन करणार नाही. या चुकीच्या पद्धतीने झालेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीविरोधात समाजवादी पक्ष न्यायालयात जाऊन कायदेशीर लढाई लढणार आहे." या घडामोडीमुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *