बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!

बिहार: वैशाली बोट दुर्घटनेने संपूर्ण बिहारला मोठा धक्का बसला आहे. यामध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत. १७ वर्षांच्या चांदणीने स्वतःचा जीव धोक्यात घालून तीन मुलांना सुरक्षित बाहेर काढलं. मात्र ती तिच्या सख्ख्या बहिणीला म्हणजेच पिंकीला वाचवू शकली नाही. अनेकांनी घरातील लहान मुलं गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील ३० जण जवळच्याच एका गावात श्राद्धासाठी गेले होते. संध्याकाळी सातच्या सुमारास सर्वजण बोटीतून परतत होते. याच दरम्यान बोट उलटली आणि बघता बघता अनेक लहान मुलं व तरुण पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या ११ वर्षांच्या अनुष्काची आई सोनिया देवीने सांगितलं की, बोटीत मोठ्या संख्येने मुलं होती. जखमींना फतेहपूर येथे उपचारासाठी नेण्यात आलं, परंतु नंतर एनएमसीएच येथे पाठवण्यात आलं.

आजोबांच्या डोळ्यांसमोर बुडाल्या नाती
६२ वर्षीय बिंदेश्वर राय यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. त्यांनी सांगितलं की, ते स्वतः आपल्या तीन नातींसह बोटीत बसले होते. बोट थोड्याच अंतरावर गेली होती की अचानक ती बुडू लागली. त्यांनी आपली नात अंकिताचा हात धरण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा हात निसटला आणि ती त्यांच्या डोळ्यांसमोर बुडाली. अमृताला तर ते पाहूही शकले नाहीत, असे ते म्हणाले. त्यांच्या सुनीता, अमृता आणि अंकिता या तिन्ही नातींचा मृत्यू झाला. सुनीता आणि अमृताचा जागीच मृत्यू झाला, तर अंकिताने रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

अनेक कुटुंबांसाठी देवदूत ठरली चांदणी
या भीषण दुर्घटनेत १७ वर्षांच्या चांदणीने धाडस दाखवलं. तिचे वडील डोमन राय यांनी सांगितलं की, त्यांची एक मुलगी पिंकी पाण्यात बुडाली, परंतु त्यांची दुसरी मुलगी चांदणीने पाण्यात उडी मारून तीन मुलांचा जीव वाचवला. जर चांदणीने हे धाडस दाखवलं नसतं, तर मृतांचा आकडा आणखी वाढला असता. मुलांना वाचवताना चांदणीचीही प्रकृती बिघडली असून तिच्या छातीत पाणी गेलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या बोट दुर्घटनेत जखमी झालेल्या सहा जणांवर एनएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *