बलराज संघई यांचा कॉलम:श्वेतरंग: विवेकाचे प्रतीक

हिंदू धर्मात नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीच्या पूजेत पांढऱ्या रंगाला विशेष महत्त्व असते, जो शांती आणि संयमाचे प्रतीक आहे. पांढरा रंग हा प्रामुख्याने शुद्धता, पावित्र्य, शांती आणि साधेपणाचे प्रतीक मानला जातो. आरोग्य आणि विज्ञान पांढऱ्या रंगाचे महत्व सांगते. वैज्ञानिकदृष्ट्या पांढरा रंग प्रकाश परावर्तित (reflect) करतो, ज्यामुळे उष्णता कमी राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात डोक्याला बांधायचा रुमाल ही पांढराच असतो. सहसा पांढरे शर्ट,पांढरे कपडे उन्हाळ्यात वापरले जातात. म्हणूनच पांढरा रंग हा मनालाच नाही तर शरीराला सुद्धा शितलता प्रदान करतो. पांढऱ्या शुभ्र श्वेत वस्त्रातील व्यक्ती शांततेने समोर आल्यास त्याचा अत्यंत उच्च आणि उत्कृष्ट असा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो. म्हणून त्याच्याशी बोलताना सुद्धा विचार करावा लागतो. अर्थातच समोरील अशा व्यक्तीला पाहून बोलणाऱ्याची सुद्धा भाषा बदलते. मानसशास्त्र आणि स्वभाव विज्ञानानुसार पांढरा रंग मानसिक शांतता प्रदान करतो. धार्मिक प्रार्थना स्थळाचा रंग देखील पांढऱ्याचा असतो. श्वेता वर्णाला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे. इस्लाममध्ये पांढरा रंग पवित्रता आणि शांती दर्शवतो, हज यात्रेदरम्यान भाविक पांढरे वस्त्र परिधान करतात. ख्रिश्चन धर्मात पोप हे शुद्धतेचे प्रतीक म्हणून पांढरे वस्त्र परिधान करतात. हा रंग मनाला थंडावा देतो, एकाग्रता वाढवतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. डिझाईन किंवा घरामध्ये पांढरा रंग वापरल्याने जागा मोकळी, उजळ आणि शांत वाटते. महिलांच्या वेणीत लावायचा गजरा देखील पांढऱ्या फुलांचा असतो. पांढऱ्या रंगाची फुलच अधिक सुगंधी असतात. ज्या रंगांमध्ये मिसळल्यानंतर सर्व रंगांना स्वतःचा रंग प्राप्त होतो. स्वतःला सिद्ध करायचे असेल तर मागे शुभ्रता, स्वच्छता, निर्मळता लागते तोच श्वेतरंग. ज्यामध्ये नितांत गोडी आहे ती साखर पांढरी, त्यात विशेष खडीसाखर तीही गोडच. गुढीपाडव्याला मराठी नववर्षा निमित्य सण साजरा करत असताना गुढीला घालायचा साखरेचा हार पांढरा. जेवण, अन्नाला योग्य ती चव आणणाऱ्या मिठाचा रंग पांढरा. पाणी निर्मळ करणाऱ्या तुरटीचा रंग.. प्रकाशकिरण, चंद्र, चांदण्या चांदणे.. शितलता प्रदान करणारे गोडी निर्माण करणारे जीवनात रस निर्माण करणारे रंग मूळात पांढरे. जैन ब्रह्मचारी साधुसंत श्वेत वस्त्र धारण करतात. ध्यान शिबिरामध्ये पांढऱ्या रंगाचा आग्रह असतो. अर्थात चंचल मनाला एकाग्र करण्यासाठी सुद्धा पांढऱ्या रंगाची आवश्यकता असते. प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडूचा रंग पांढरा. शाडूची असो अथवा मार्बलची तयार होणारी मूळ मूर्ती देवाची प्रतिमा पांढरीच असते. घराच्या भिंतींना आधी पांढरा रंग देऊन वाढवला जातो मग त्यावर दुसरे रंग बसतात अर्थात आपल्याला हवे ते आपले घर सजवणारे. विवेक आणि ज्ञान जागृती करण्यासाठी दोन्ही भुवईच्या मध्ये अर्थात पियुष्य ग्रंथीवर दर्शन केंद्र ज्याला म्हणतात त्यावर चमकत्या शुभ्र श्वेत रंगाचे ध्यान केले जाते. म्हणूनच मलाही सर्वात जास्त आवडतो पांढरा रंगच जो मनाला निर्मळ शांत आणि स्वस्थ ठेवतो आणि विवेकाचा मुख्य आधार आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *