एन. रघुरामन यांचा कॉलम:आपण आयुष्याचा व्यापक दृष्टिकोन गमावून ‘मायोपिक’ होत आहोत?

गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांत कार्यरत असणारे खताल दांपत्य त्यांच्या प्रदीर्घ नाइट शिफ्टवरून घरी परतले होते. ही शिफ्ट दुसऱ्या दिवशी थेट दुपारपर्यंत चालली होती. थकलेले, चिडलेले आणि झोपण्यासाठी व्याकुळ झालेले हे दांपत्य कालाचौकी येथील पोलिस क्वार्टरमध्ये पोहोचले. पण त्यांची झोप उडवण्यासाठी एक नवीनच अडथळा तिथे त्यांची वाट पाहत होता. शेजारी राहणाऱ्या सांगळे कुटुंबातील चार वर्षांचा मुलगा बाहेर पॅसेजमध्ये खूप गोंधळ घालत खेळत होता. हजारो कुटुंबे एकमेकांच्या अगदी जवळ राहत असलेल्या मुंबईसारख्या शहरात यानंतर घडले, ते काही नवीन नाही. मुलाच्या आवाजावरून झालेली बाचाबाची शेजाऱ्यांमधील थेट भांडणात रूपांतरित झाली. पण हे भांडण घराच्या दारावर संपण्याऐवजी थेट रात्री काळाचौकी पोलिस ठाण्यात पोहोचले. हे पोलिस ठाणे दोन्ही कुटुंबांसाठी निष्पक्ष ठिकाण होते. इथेच शेजाऱ्यांमधील एक छोटीशी अडचण मोठ्या वादात रूपांतरित झाली. सांगळेसुद्धा प्रदीर्घ ड्युटी संपवून उशिरा रात्री पोलिस ठाण्यात आले. ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप आहे. सांगळे यांनी तिथे खताल आणि त्यांच्या पत्नीशी असभ्य वर्तणूक केली. एका पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना शांत राहण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी ऑन-ड्युटी अधिकाऱ्याशीही गैरवर्तन केले. त्यानंतर नेहमी ऐकायला मिळणारे तेच ओळखीचे वाक्य समोर आले— ‘मी कोण आहे हे तुला ठाऊक आहे का? मी तुझी खाकी वर्दी उतरवू शकतो आणि तू माझे काहीही करू शकणार नाहीस.’ शेवटी गुन्हे शोध शाखेच्या साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना शांत करण्यासाठी डिटेक्शन रूममध्ये नेले. त्यांनी दारू प्यायली की नाही हे तपासण्यासाठी रक्ताचे नमुने देण्यास सांगितले, तेव्हा ते अधिकच आक्रमक झाले . त्यांनी एका कॉन्स्टेबलवर खुर्ची फेकून मारली. या घटनेत कॉन्स्टेबलच्या छातीला दुखापत झाल्याने त्यांना डॉक्टरांकडे न्यावे लागले. या झटापटीत सांगळे यांनाही दुखापत झाली आणि नंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. सध्या ते वैद्यकीय रजेवर आहेत. पॅसेजमध्ये एका मुलाच्या गोंधळावरून सुरू झालेली गोष्ट शेवटी सांगळे यांच्याविरुद्ध दाखल ‘एफआयआर’ आणि विभागीय चौकशीपर्यंत पोहोचली. त्यांना नोटीस बजावण्यात आली असून सखोल चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. हीच गोष्ट मला विचार करायला भाग पाडते की, आपण रोजच्या आयुष्यात अशा लहान-सहान गोष्टींना इतके महत्त्व का देतो? सुरुवातीच्या बाचाबाचीत कोण योग्य होते आणि कोण चुकीचे, हा मूळ प्रश्न नाही. लहान मुलाचा गरजेपेक्षा जास्त गोंधळ थकलेल्या शेजाऱ्याला नक्कीच त्रासदायक ठरू शकतो. कुणीही सतत सहन करत राहील अशी अपेक्षा करणेही चुकीचे आहे. खताल यांनी सांगळे यांच्याशी बोलायला कशी सुरुवात केली होती, हेही कदाचित ठाऊक नाही. कदाचित त्यांच्या बोलण्याच्या ढंगाने परिस्थिती अधिक बिघडवली असेल. पण खरा व मोठा प्रश्न हा आहे की, क्षणिक त्रासाला आपण वर्षानुवर्षे कष्ट करून उभारलेल्या आयुष्यापेक्षा अधिक महत्त्वाचे का ठरू देतो? आपण नेहमी चांगली नोकरी मिळवणे, अधिक पैसे कमवणे, छान घर खरेदी करणे, मुलांचे भविष्य सुरक्षित करणे आणि निवृत्तीनंतरसाठी पुरेशी पुंजी साठवणे याबद्दल चिंतेत असतो. वयस्कर होत असलेल्या पालकांची काळजी घेणे, स्वतःचे आरोग्य जपणे, घराची डागडुजी करणे आणि भविष्यात उत्पन्न कमी होईल त्या काळासाठी थोडी आर्थिक सुरक्षा निर्माण करणे, याबद्दल सतत विचार करत असतो. पण छोटासा वाद होतो, तेव्हा या सर्व प्राधान्यक्रमांचा आपल्याला विसर पडतो. याच स्थितीला मी ‘आयुष्याचा मायोपिया’ (अदूरदृष्टी) म्हणतो. दृष्टिशास्त्रज्ञ (ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट) मायोपियाचा अर्थ ‘निकटदृष्टिता’ (शॉर्ट-साइटेडनेस) असा सांगतात— म्हणजे जवळच्या गोष्टी स्पष्ट दिसणे, पण दूरच्या गोष्टी पाहताना त्रास होणे. आपणही अगदी तसेच वागतो. तात्कालिक चिथावणी आपल्याला स्पष्ट दिसते. पण त्याचे दूरगामी वाईट परिणाम मात्र धूसर होतात. त्या क्षणी आपल्या हातातून निसटतो तो म्हणजे ‘दृष्टिकोन’(पर्सपेक्टिव्ह). आणि हा दृष्टिकोन ही केवळ तात्त्विक गोष्ट नाही. तो गमावण्याची मोठी किंमत शरीरालाही मोजावी लागते. राग व दीर्घकाळ राहणारा मानसिक ताण शरीराच्या ‘स्ट्रेस रिस्पॉन्स’ला सक्रिय करतात. त्यामुळे एड्रिनलीन,कॉर्टिसॉलसारखी संप्रेरके वाढतात. फंडा असा की, अशा प्रतिक्रिया आपल्याला एखाद्या मोठ्या धोक्याशी सामना करण्यास मदत करू शकतात. परंतु अगदी क्षुल्लक गोष्टींवर या प्रतिक्रिया वारंवार उमटणे म्हणजे आपण शारीरिक व भावनिक तणावाचे ओझे वाढवून घेणे आहे. म्हणूनच हे कधीही विसरू नका— ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.’

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *