नाशिक: निवेदनांना केराची टोपली दाखवल्याने संताप! निफाडमध्ये तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने चक्क नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवरच सोडले मोकाट कुत्रे!

नाशिक: जिल्ह्यातील निफाड शहरातून एक अत्यंत चर्चेत आलेली आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. निफाड शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे सामान्य नागरिक, शाळकरी मुले आणि वृद्ध त्रस्त झाले आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या गंभीर समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायत प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. अखेर प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने एका अत्यंत अनोख्या आणि आक्रमक आंदोलनाची हाक देत थेट नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मोकाट कुत्रे सोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

नेमके आंदोलन कसे झाले? मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे आणि नगरसेविका रूपाली रंधवे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक नगरपंचायत कार्यालयात दाखल झाले. प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेचा आणि दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी त्यांनी कार्यालयात चार ते पाच मोकाट कुत्रे आणले आणि थेट नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलासमोर ती कुत्री सोडली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला आणि काही काळासाठी भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलासमोर खुर्चीवर बसलेले अधिकारीही या प्रकारामुळे काहीसे अवाक झाले.

नोटांच्या नोटांचा हार घालत प्रतिकात्मक निषेध आंदोलकांनी केवळ कुत्रेच सोडले नाहीत, तर प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध करत मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलला पैशांच्या नोटांचा हार घालून अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला. निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू असताना प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात आणि निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. या अनोख्या आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाने  मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *