जळगाव: पाळधी बायपासवर अपघातांचे सत्र सुरूच! भरधाव आयशरच्या धडकेत विवाहाला अवघे तीन महिने झालेल्या ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

जळगाव: पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर अपघातांची मालिका आणि मृत्यूचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. या महामार्गावर झालेल्या आणखी एका अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघातात दुचाकीस्वार ३२ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. पाळधी रेल्वे उड्डाणपुलावर एका भरधाव आयशर मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात योगेश गजमल राक्षे (वय ३२, रा. पथराड, ता. धरणगाव, जि. जळगाव) असे मृत झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव असून, अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत योगेश राक्षे हा जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील एका खताच्या गोदामात मजुरीचे काम करत होता. नेहमीप्रमाणे मंगळवारी तो पथराड येथील मुकादम चेतन शितोळे यांच्यासोबत कामावर गेला होता. आपले काम आटोपून तो दुचाकीवरून आपल्या मित्रासोबत घरी परतत असताना, पाळधी रेल्वे उड्डाणपुलावर मागून येणाऱ्या एका भरधाव आयशर मालवाहू वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत योगेश रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्यावर काळाने घाла घातला. अपघातानंतर त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातास कारणीभूत ठरलेले आयशर वाहन तसेच चालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल (३८, रा. भावनगर, कोलकाता) याला ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या घटनेमुळे योगेशच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. योगेश हा आई-वडील आणि मोठ्या भावासह पथराड येथे राहत होता. त्याच्या संसाराची आणि नव्या आयुष्याची नुकतीच कुठेतरी सुरुवात झाली असताना, अवघ्या तीन महिन्यांतच त्याच्यावर काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी बायपासवरील आसोदा पुलाचा भराव खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती आणि अवजड वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली होती. त्यानंतर वारंवार होणारे बदल आणि बायपासवरील बेफाम वाहनांची वर्دळ यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, या महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा आणि प्रशासकीय नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *